मुंबई : उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजप आघाडीवर राहिल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी वर्तवलाय. याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येतोय. याचा सकारात्मक परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीवर दिसून येतोय. आज सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात दिसत आहेत.
उत्तर प्रदेश या देशातील सर्वाधिक जागा असणा-या राज्यात भाजपला बहुमत मिळालं, तर मंगळवारी शेअर बाजार जोरदार उसळी घेण्याची शक्यता आहे. भाजपला निर्णायक बहुमत न मिळता केवळ सर्वाधिक जागा मिळाल्या तरीदेखील शेअर बाजार तेजीत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष सत्तेवर आला तर मात्र निफ्टी गडगडण्याची शक्यता आहे.
मात्र ही घसरण तात्पुरती असेल आणि बाजार तत्काळ सावरेल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतायत. 2016 च्या शेवटच्या तीन महिन्यांत परकीय गुंतवणुकदारांनी सुमारे 460 कोटीं डॉलरची गुंतवणूक काढून घेतली होती. 2017 च्या जानेवारी आणि फेब्रुवारीत 200 कोटीं डॉलरची गुंतवणूक परत आलीय. उत्तर प्रदेशच्या निकालानंतर परदेशी गुंतवणूकदेखील वाढू शकते. याचा परिणाम निर्देशांकावर होऊ शकतो.