मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांना ईडीने अटक केली असल्याची बातमी पीटीआयने दिली आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ कुटुंबियांसमोरच्या अडचणी वाढतच चालल्यात. हायकोर्टानं नुकतंच तपास यंत्रणांना कारवाईबाबत कडक सूचना केल्यात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासमोरील अडचणी संपण्याची काही चिन्हेच दिसत नाहीयेत. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर ईडीनं पुन्हा छापे घातले होते.
भुजबळांच्या घर आणि कार्यालयांसह नऊ ठिकाणी छापे घातले आहेत अशी माहिती भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिलीय होती. भुजबळांना अटक अटळ असल्याचंही सोमय्यांनी सांगितलंय.
समीर आणि पंकज भुजबळ यांनी कोणत्या जेलमध्ये जावं ते त्यांनी ठरवावं असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. दोन दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचलनालयानं छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांना नोटीस बजावली होती.
हायकोर्टाच्या सूचनेनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयानं छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांना नोटीस बजावली होती.
८०० कोटींच्या गैरव्यवहारांबाबत ही नोटीस आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा, नवी मुंबईत खारघरमधील ४४ कोटींच्या हेक्जावर्ल्ड गृहप्रकल्पाबाबतची तक्रार तसंच इंडोनेशियास्थित कोळसा प्रकल्पाशी सबंधीत पैशांचा व्यवहार यावर इडीनं नोटीस बजावली होती.
भुजबळ कुटुंबियांच्या मालकीची सिंगापूरमधील कंपनी आर्मस्ट्रॉंग ग्लोबल आणि आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर यांनी इंडोनियाशातील काही कोळसा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजेच 'फेमा' आणि मनी लॉन्ड्रींग कायद्यानुसारही चौकशी केली जाणार आहे.