मुंबई : डोंगरीच्या फुटपाथवर सापडलेला मुलगा आज नेदरलँडचा अधिक्षक झाला आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरंय. फुटपाथवर सापडलेल्या या मुलाला डोंगरीच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले.
नेदरलँडहून आलेल्या दांपत्याने या मुलाला दत्तक घेतले आणि लहानाचे मोठे केले त्याला शिकवले. पुढे जाऊन हा मुलगा लष्करात दाखल झाला. आज फुटपाथवरचा हाच मुलगा नेदरलँडमध्ये पोलीस अधीक्षक आहे.
जमैल मुझॅम या पोलीस अधीक्षकाने सोमवारी ४६ वर्षांनंतर डोंगरी बालसुधारगृहाला भेट दिली. १९७० सालात डोंगरीच्या फुटपाथवर बेवारस सापडलेल्या जमैल याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले. ३ वर्ष बालसुधारगृहात सांभाळ केल्यानंतर एका धर्मगुरूने त्याला सेंट कॅथरीन अनाथालयात नेले. या ठिकाणी काही वर्षे काढल्यानंतर हिंदुस्थान भेटीवर आलेल्या मुझॅम दांपत्याने जमैल याला दत्तक घेतले. माझा जन्म कुठला, मी इथपर्यंत कसा पोहचलो याचा इतिहास मुलांना समजावा यासाठी पत्नी आणि मुलांना घेऊन येथे आल्याचे जमैल याने सांगितले.
जमैल डोंगरी बालसुधारगृहात आपली कहाणी सांगत होता, माझे आईवडील आता वृद्ध झालेत. नेदरलँडमध्ये लष्करात दाखल झालो. १८ वर्षांची सेवा केल्यानंतर अधिकारी बनलो. २०१० सालात पोलीस दलात दाखल झालो आणि सध्या नेदरलँडच्या ब्रेडा शहराचा मुख्य अधीक्षक आहे. जमैलची कहाणी ऐकून पोलीस अधिकारी तसेच डोंगरी बालसुधारगृहातील सर्वच अचंबित झाले.
बालसुधारगृहात ठेवलेल्या मुलांची त्यांनी आपुलकीने विचारपूस केली. त्यांना दिले जाणारे जेवण, त्यांचे शिक्षण याबाबत चौकशी केली. इतकी मुले बेवारस सापडतात, रस्त्यावर भीक मागतात, गुन्हेगारीत अडकतात याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. मुंबई आणि विशेषकरून डोंगरीतील आठवणी आजही त्यांना आठवतात. बेस्टच्या डबलडेकर बसने तर मनात अशी जागा केली आहे की ही बस नेहमी डोळ्यांसमोर दिसते. मुंबईबद्दलच्या आठवणी सांगताना जमैल भारावून गेले होते.