www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनेत ‘सकाळ’ वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून कार्यरत असणाऱ्या अवघ्या २९ वर्षीय योगेश पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. योगेश पवार या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आपल्या वडिलांसह राहात होते. या दुर्घटनेत त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झालाय.
शुक्रवारी ही इमारत कोसळल्यावर योगेश यांच्याशी परिचय असणाऱ्या अनेक पत्रकारांनी आणि नातेवाईकांनी त्यांना फोन लावायचा प्रयत्न केला, पण फोन लागत नव्हता. त्यामुळे सगळ्यांच्याच चिंतेत भर पडली होती. योगेश पवार या संकटातून सुखरूप बाहेर, अशी सगळेच जण अपेक्षा व्यक्त करत होते. या इमारतीत योगेश त्यांचे वडिल अनंत पवार (५५ वर्ष) यांच्यासोबत राहत होते. ते महापालिकेच्या मंडई विभागात कार्यरत होते.
मात्र, अखेरीस त्यांचा मृतदेह आज बाहेर काढण्यात आला आणि सगळ्या आशा फोल ठरल्या. अनंत पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मात्र, त्यांच्या छातीवर त्यांच्या पत्नीचे नाव गोंदवलेले असल्यामुळे त्यांची ओळख नातेवाईकांना पटवता आली होती. तर योगेशचा मृतदेह शनिवारी दुपारी ढिगाऱ्याखालून काढण्यात आला. त्याच्या मृतदेहाची ओळख पटली असून योगेश याचे बंधू सिद्धार्थ पवार यांनी मृतदेह ओळखले आहे.
अनंत पवार यांची पत्नी, दोन मुले व मोठी मुलगी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात देवधे या गावी वास्तव्याला आहेत. घटनेनंतर ते मुंबईत येण्यासाठी रवाना झाले आहेत. योगेश यांच्या निधनाने अवघ्या पत्रकार विश्वाला धक्का बसला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.