www.24taas.com, मुंबई
फेरीवाल्याचा कारवाई दरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप ठेवण्यात आलेले वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे हे जर दोषी नसतील तर त्यांचे पोस्टींग पूर्वीच्याच ठिकाणी केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेय.
चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांची अशा पध्दतीने तडकाफडकी बदली केल्यास पोलिसांचे मनोधैर्य खचेल. त्यांची करण्यात आलेली बदली रद्द करावी, अशी मागणी विनोद तावडे यांनी भेटीदरम्यान केली होती.
वसंत ढोबळे यांच्या चौकशीचा अहवाल आठवडाभरात मागविण्यात येईल. या चौकशी अहवालात ते दोषी आढळले नाही तर त्यांची बदली होणार नाही. केलेली बदली रद्द करून त्याच ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना आश्वासन देताना स्पष्ट केले.
ढोबळेंची बदली करण्यामागे राजकारण केले जात आहे, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. राज्य सरकार पोलिसांचे मनोबल वाढविण्या ऐवजी खच्चीकरण करण्यात गुंतले आहे, असेही राज म्हणाले होते.
दरम्यान, अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात वसंत ढोबळे यांनी केलेली कारवाई योग्य आहे. अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची बदली करणे हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे. असे वाकोला येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यांनी मोर्चाही काढला होता. तर काहींनी सह्यांची मोहीम राबविली होती.