डायलिसीस सेंटर्स... 'सिद्धीविनायक ट्रस्ट'चा स्तुत्य उपक्रम!

समाजोपयोगी उपक्रमांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढं करणारे सिद्धीविनायक ट्रस्ट आता राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये डायलिसिस सेंटर उभे करणाराय. दहा कोटी रुपये खर्च करून जिल्हा रुग्णालयांना डायलिसिस युनिट दिली जाणारेत. यामुळं ग्रामीण भागातल्या किडनी रुग्णांसाठी स्वस्तात डायलिसिसची सुविधा मिळणारा आहे.

Updated: Apr 11, 2015, 11:06 PM IST
डायलिसीस सेंटर्स... 'सिद्धीविनायक ट्रस्ट'चा स्तुत्य उपक्रम! title=

मुंबई : समाजोपयोगी उपक्रमांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढं करणारे सिद्धीविनायक ट्रस्ट आता राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये डायलिसिस सेंटर उभे करणाराय. दहा कोटी रुपये खर्च करून जिल्हा रुग्णालयांना डायलिसिस युनिट दिली जाणारेत. यामुळं ग्रामीण भागातल्या किडनी रुग्णांसाठी स्वस्तात डायलिसिसची सुविधा मिळणारा आहे.

राज्यात नैसर्गिक संकटावेळी नेहमीच प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदीर ट्रस्टनं हात पुढं केलाय. राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर सिद्धीविनायक मंदीर ट्रस्ट आता प्रत्येक जिल्ह्यात डायलेसिस सेंटर उभे करणाराय. 

आरोग्य विभागाच्या सहाय्यानं प्रत्येक जिल्हा रुग्णालयात हे डायलिसिस युनिट ठेवलं जाणाराय. सुमारे 102 डायलिसिस युनिट यासाठी खरेदी केली जाणार आहेत. यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च सिद्धविनायक ट्रस्ट उचलणार आहे, अशी माहिती सिद्धीविनायक मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी दिलीय. 

सध्या प्रभादेवी इथं ट्रस्टच्या वतीनं 22 युनिटचे डायलिसिस सेंटर कार्यरत असून दिवसाला 42 रुग्ण या सेवेचा लाभ घेतात. या ठिकाणी वर्षाला 8 हजार 800 डायलिसिस केली जातात. विशेष म्हणजे केवळ अडिचशे रुपयांमध्ये इथं डायलिसिस केली जातात. 

राज्याच्या ग्रामीण भागातल्या किडनी रुग्णांसाठी डायलिसिसची असलेली गरज लक्षात घेवून जिल्हा रुग्णालयाला डायलेसिस देण्याचा उपक्रम ट्रस्टमार्फत सुरु केला जाणार आहे. 

भक्तांच्या देणगीतून जमा झालेला पैसा केवळ मंदीर ट्रस्टच्या तिजोरीमध्ये पडून राहण्याऐवजी तो अशाप्रकारे समाजोपयोगी कारणांसाठी वापरला जात असल्यानं या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.