देवनार डम्पिंग ग्राऊंड आगीने घेतला चिमुकलीचा बळी

अखेर ज्याची भीती होती तेच झालंय. देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीनं एका चिमुकलीचा बळी घेतलाय. मात्र आपले नेते दंग आहेत या आगीचं राजकारण करण्यात. धुरामध्ये गुदमरणाऱ्या नागरिकांना या पुढाऱ्यांशी काही देणंघेणं नाही. त्यांना हवाय या समस्येवर कायमस्वरुपी इलाज.

Updated: Mar 23, 2016, 09:40 PM IST
देवनार डम्पिंग ग्राऊंड आगीने घेतला चिमुकलीचा बळी title=

मुंबई : अखेर ज्याची भीती होती तेच झालंय. देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीनं एका चिमुकलीचा बळी घेतलाय. मात्र आपले नेते दंग आहेत या आगीचं राजकारण करण्यात. धुरामध्ये गुदमरणाऱ्या नागरिकांना या पुढाऱ्यांशी काही देणंघेणं नाही. त्यांना हवाय या समस्येवर कायमस्वरुपी इलाज.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतला सर्वात मोठा प्रश्न कोणता? लोकलची गर्दी?, पाणीटंचाई?, घामाच्या धारा? घाटकोपर परिसरातल्या नागरिकांना विचाराल, तर सध्या सर्वात मोठी डोकेदुखी आहे देवनार डम्पिंग ग्राऊंडची. सातत्यानं लागणारी आग, विषारी धुराचे लोट, दुर्गंधी यामुळे नागरिकांचं जिणं मुश्किल झालंय. इथल्या कच-याला लागलेली आग अजून धुमसतेय.

महापालिकेतले अधिकारी मात्र दंग आहेत आग लागली की लावली या वादात. मुळात देवनार डम्पिंग ग्राऊंड म्हणजे कायदा, नियम, अटी-शर्तींची कचराकुंडी. पोलीस, कचरा माफिया, महापालिका अधिकारी, ठेकेदार यांना लाखो करोडोंचा मलीदा मिळण्याचं ठिकाण. इथल्या सुरक्षा भिंती तुटलेल्या. नव्हे, तोडलेल्या आहेत.

 

रात्रीच्या अंधारात डेब्रिजचे ट्रकच्या ट्रक इथं रिकामे होतात... इथलं कंत्राट देण्यात आलेल्या यू पी एल आणि ग्लोबल तत्व या कंपन्यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. 
 
अधिकारी आणि ठेकेदारांच्या अभद्र युतीमुळे हा प्रश्न विकोपाला गेलाय. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या कोणत्याच घोषणेवर नागरिकांचा विश्वास नाही. डम्पिंग ग्राउंड कायमचं बंद, ही त्यांची एकच मागणी आहे.
 
आग आणि विषारी धुरामुळे स्थानिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. त्यांना श्वासनाचे विकार होऊ लागलेत. याला जबाबदार असणारे मात्र आजही निर्धास्त आहेत. त्यांची भ्रष्ट युती तोडली जात नाही, तोपर्यंत कायमस्वरुपी तोडगा निघणार नाही. पण त्यासाठी आगीचं राजकारण न करता खरंच ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.