स्वाती नाईक, मुंबई : धावत्या मुंबईला सायकलवरुन गाठत चाकरमान्यांना डबे पोहचवणारे डबेवाले आणि त्यांच्या मॅनजमेंटची भूरळ भल्या-भल्यांना पडल्याशिवाय राहत नाही आणि आता हेच डबेवाले आणखी स्मार्ट बनलेत.
आजच्या स्पर्धेच्या जगाला तोंड देण्यास मुंबईचा डब्बेवालाही आता सज्ज झालाय. वर्षानूवर्षे मुंबईच्या चाकरमान्यांना वेळेवर आणि खात्रीशीर डबे पोहचवण्याचं काम करणारे आणि या शिस्तशीर कामाबद्दल मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळख असलेले डबेवाले यापुढे मोपेड या लुनावरून मुंबईच्या रस्त्यावरुन चाकरमानी वर्गाला डबे पोहोचवताना दिसतील, अशी माहिती मुंबई डबे वाहतूक मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिलीय.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ पतसंस्थेने पुढाकार घेत नवी मुंबई मधून डबेवाल्यांसाठी या मोपेडची एकत्र खरेदी केलीय. एका मोपेडची किंमतही पाच हजारांनी कमी केल्याने या डबेवाल्यांना दुचाकी देखील स्वस्तात उपलब्ध झालीय.
आजपर्यंत डबेवाले ऊन पावसाची तमा न बाळगता, डोक्यावरुन, हातगाडीने किंवा सायकलचा वापरकरून घरचे जेवण चाकरमान्यांना वेळेत पोहोचवित असत. पाच हजारांहून अधिक हे डबेवाले आता डबे पोहचवण्यासाठी खास बनविलेल्या लुना गाडीचा वापर करणार आहेत. इतकच नाही तर संध्याकाळी काम संपल्यावर ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या वस्तू पोहोचविण्याची जबाबदारी जोड धंदा म्हणूनही हे डबेवाल्यांनी घेतलीय. त्यामुळे स्मार्ट मुंबईतले आता डबेवालेही स्मार्ट आहेत असच म्हणावं लागेल.