www.24taas.com, मुंबई
एलपीजी गॅस सिलिंडरधारकांना आता गरजेप्रमाणे सिलिंडर देण्याची योजना तेल कंपन्यांकडून सुरू केली जाणार आहे. त्यामुळे सिलिंडर्सचा काळाबाजार रोखला जाईल, असा विश्वास कंपनीच्या सूत्रांनी व्यक्त केलाय.
ग्राहकांना आता प्रत्येक वेळी १४ किलोचा सिलिंडर घेण्याची गरज पडणार नाही. कारण, आता प्रत्येक ग्राहक आपापल्या गरजेनुसार तीन आणि पाच किलोचाही सिलिंडर विकत घेऊ शकणार आहेत. यासाठी तेल कंपन्या तीन आणि पाच किलोच्या साईजचे सिलिंडर पुरवण्याची तयारी करत आहेत. सध्या बाजारात बेकायदेशीरपणे छोट्या सिलिंडरचं रीफिलींग केलं जातं. मात्र, यात ग्राहकांचा तोटा होता. सरकारी कंपन्यांनी ही सुविधा सुरू केल्यावर ग्राहकांना नक्कीच फायदा होणार आहे.
अर्थात तीन आणि पाच किलोचे हे सिलिंडर सरकारी तेल कंपन्या सबसिडीच्या दरात विकणार की बाजारभावानुसार, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तेल कंपन्यांच्या प्रस्तावाला पेट्रोलियम मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कारवाईला गती येऊ शकेल.