शक्ती मिल गँगरेप प्रकरणात चारही नराधम दोषी

मुंबईत शक्ती मिल कंपाऊंडमध्ये पत्रकार तरूणीवर आणि टेलिफोन ऑपरेटवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय आज निकाल सुनावणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 20, 2014, 11:50 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात चारही आरोपी कोर्टात दोषी ठरलेत. मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना दोषी करार दिलंय. उद्या कोर्ट त्यांना शिक्षा सुनावणार आहे. विजय जाधव, कासीम बंगाल, सिराज रेहमान, सलीम अन्सारी असं या चारही आरोपींची नावं आहेत.
गेल्या वर्षी शक्ती मिल परिसरात एका महिला पत्रकारावर २२ ऑगस्ट २०१३ रोजी सामूहिक बलात्कार केला गेला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एका टेलिफोन ऑपरेटर महिलेनंही ३१ जुलै २०१३ रोजी हाच प्रसंग आपल्यावरही ओढावल्याचं उघड केलं होतं. या दोन्ही प्रकरणांत या प्रकरणातील चारही सज्ञान आरोपी दोषी ठरलेत.
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आणि निकाल ऐकण्यासाठी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटीलदेखील मुंबई सत्र न्यायालयात उपस्थित झाले होते.

'त्या' नराधमांना फाशी होणार?
सहा महिने चाललेल्या या खटल्यात एकूण पाच आरोपी आहेत, त्यातला एक जण अल्पवयीन आहेत. अल्पवयीन आरोपी वगळता उरलेल्या चार जणांना आता शिक्षा सुनावली जाणार आहे.
दिल्लीत निर्भयावर झालेला अत्याचार आणि मुंबईत शक्तीमिल कंपाऊंडमध्ये झालेला गँगरेप या दोन घटनांनी भारतात महिला सुरक्षित नाहीत हे अधोरेखित केलं. शक्ती मिल बलात्कार प्रकरणाने तर मुंबईवरच एक काळा डाग लागला. तो डाग पुसून टाकण्यासाठी आणि पीडित तरूणींना न्याय मिळवून देण्यासाठी आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी होऊ लागली. मुंबई क्राईम ब्रँचने तातडीने तपास करत आरोपींना गजाआड केलं आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. सहा महिन्यांच्या आत खटला पूर्ण करून न्यायालय आता अंतिम निकाल देणार आहे.
 
शक्तीमिलमध्ये झालेल्या दोन्ही बलात्कार प्रकरणात पोलिसांनी जवळपास ९६२ पानांचं आरोपपत्र दाखल केलं. ८० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. कलम ३७६ डी नुसार गँगरेप, कलम ३७७ नुसार अनैसर्गिक संभोग, कलम ३४१, ३४२ नुसार बेकायदा डांबून ठेवणे, कलम २०१ नुसार पुरावे नष्ट करणे, कलम ३४ समान उद्देश, १२० बी आयपीसी गुन्हेगारी कट रचणे ही कलम आरोपींवर लावण्यात आली आहेत.

केवळ ७२ तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातल्या इतर निर्भयांनी समोर यावं, यासाठी अगदी वेगळ्या पद्धतीने हे प्रकरण हाताळण्यात आलं, अशी माहिती एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी दिलीय.
दिल्ली गॅंगरेप प्रकरणातील आरोपींना ३७६ डी नुसार फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. हाच कलम ३७६ डी मुंबई गँगरेप प्रकरणातील आरोपींवर लावण्यात आलाय. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना ही फाशीची शिक्षा अशी मागणी केली जातेय. 

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.