मुंबई : मिरारोड रेल्वे स्थानकात आज ८ आरोपींनी झाडू मारत स्टेशन परिसराची साफ-सफाई केली आहे. मुंबई उच्च न्यायालायानं या आरोपींना मिरारोड रेल्वे स्थानकात झाडू मारण्याची शिक्षा दिली होती. सुमारे वर्षभरापूर्वी ४ एप्रिल २०१५ रोजी दोन मुलांच्या गटात हाणामारी झाली होती.
गोराई परिसरात या दोन्ही गटातील मुलांनी दारूच्या नशेत मारामारी केली होती. त्यावेळी गोराई पोलिसांनी या सर्व मुलांवर कलम ३२६ आणि ३२४ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनवाई करताना मुंबई उच्च न्यायालयानं या सर्व मुलांना साफ सफाई करण्याची शिक्षा सुनावली.
न्यायालयानं मीरारोडमधील ८ मुलांना मिरारोड स्टेशन तर गोराई इथल्या मुलांना महापालिकेच्या शाळेची साफ-सफाई करण्याची शिक्षा सुनावली आहे. पुढील ३ महिने त्यांना प्रत्येक रविवारी हि सफाई करायची आहे. मारामारीच्या प्रकरणात अशा प्रकारे साफ सफाई करण्याची शिक्षा पहिल्यांदाच सुनावण्यात आलीय.