www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत झालेल्या भव्य सभेत मोदींनी नवा नारा दिला. पक्षासाठी नाही तर देशासाठी व्होट करा असं आवाहन करताना त्यांनी ‘व्होट फॉर इंडिया’ असा नवा नारा दिला.
महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने आदर्श चौकशी आयोगाचा अहवाल दाबल्याचा आरोप करत नरेंद्र मोदींनी यांनी मुंबईतल्या महागर्जना रॅलीत `काँग्रेस चले जाव`चा नारा दिला. चार लाखांवर आलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने भाजपची ही महागर्जना रॅली यशस्वी ठरली.
मुंबईत झालेल्या महागर्जना रॅलीसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आले होते. मोदींचं भाषण ऐकण्यासाठी बीकेसीतलं मैदान दुपार होण्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या गर्दीने खच्चू भरलं होतं. नुकत्याच झालेल्या नागपूरच्या विधीमंडळातील हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने आदर्श घोटाळ्यावरील चौकशी अहवाल फेटाळ्याचा मुद्दा मोदींनी उपस्थित केला. काँग्रेसने आदर्श घोटाळा प्रकरण दडपलं, असा आरोप मोदींनी केला. मोदींचं भाषण दिसू नये यासाठी मुंबईतील अनेक केबल सेवा बंद केल्याचं पक्षाचे नेते आशिष शेलार म्हणाले. त्यावर मोदींनी राज्य सरकारवर तोंडसुख घेतलं. टीव्हीवर दिसत नसलो तरी देशातल्या जनतेच्या ह्रदयात आहे, असं सांगत मोदींनी टोला लगावला. मुंबईतल्या मोदींच्या महार्गजना रॅलीसाठी मुंबईपेक्षा राज्यातून मोठ्या संख्यने कार्यकर्ते हातात झेंडे आणि ढोल-ताशांसह आले.
नरेंद्र मोदींचा इतिहास कच्चा…
गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यात फरक खूप मोठा आहे, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केलाय. आजवर गुजरातमध्ये १४ मुख्यमंत्री झालेत तर महाराष्ट्रात तेवढ्याच काळात २६ मुख्यमंत्री झालेत, असा अजब दावा मोदींनी आपल्या भाषणात केला.
यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावलाय. मोदींनी ‘व्होट फॉर इंडिया’ अशी घोषणा केलीय तर आमची घोषणा ‘व्होट फॉर भारत’ आहे... यात भारतच जिंकेल अशी मखलाशी त्यांनी केलीय. तसंच राज्यात २६ मुख्यमंत्री झाले असं वक्तव्य करणाऱ्या मोदींचा इतिहास कच्चा आहे, असं सांगत राज्यात आत्तापर्यंत १७ मुख्यमंत्री झाले, हे त्यांनी स्पष्ट केलंय.
महाराष्ट्र, गुजरात आणि भ्रष्टाचार...
भ्रष्टाचाराबद्दल बोलताना महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांतल्या स्थितीचं वर्णन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं. यावेळी, एलबीटी म्हणजे ‘लूट बाटनें की टेक्निक’ असल्याचं मोदींनी म्हटलं तर महाराष्ट्रात नोकरीसाठी शिफारशीची लागते... गुजरातमध्ये असं होत नाही... गुजरातमध्ये गुणवेत्तेच्या आधारे नोकऱ्या दिल्या जातात, असं मोदींनी म्हटलं.
आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी यावेळी मोदींनी दोन राज्यांना जोडणाऱ्या बॉर्डरवरच्या दोन चेकपोस्टचं उदाहरण दिलं. यातील एक चेकपोस्ट महाराष्ट्रात येतं... आणि तेच पुढे जाऊन गुजरातला जोडतं... तिथे गुजरातचं दुसरं चेकपोस्ट आहे... याविषयी बोलताना महाराष्ट्रातील चेकपोस्टची गेल्या १० वर्षांतील कमाई आहे ४३७ कोटी रुपये, तर गुजरात चेकपोस्टची कमाई आहे तब्बल १४७० कोटी रुपये, असं म्हणत महाराष्ट्रात गुजरातपेक्षा जास्त भ्रष्टाचार बोकाळलाय असं मोदींनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.