अमित जोशी, www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरे अशी जाहिरात करणा-या म्हाडाच्या लॉटरीकडे सर्वसमान्य पाठ फिरवत आहेत. गेल्या पाच लॉटरीतील अर्ज करणा-यांची संख्या बघितली तर दरवर्षी ती कमी होत असल्याचं स्पष्ट होत आहे. याचं एकमेव कारण डोळे पांढरे करणा-या म्हाडाच्या घरांच्या वाढत्या किंमती.
2008 ला म्हाडाच्या घरांचे अर्ज घेण्यासाठी आणि भरण्यासाठी अशी लांबच लांब रांग लागल्याचं आपल्याला आठवत असेल. त्यानंतर मात्र म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणा-यांची संख्या कमी व्हायला लागली. 2009 ला 3863 घरांसाठी तब्बल 4 लाख 33 हजार 303 नागरीकांनी अर्ज केले होते. 2010 मध्ये 3449 घरांसाठी 3 लाख 28 हजार 378 अर्ज, 2011 मध्ये 4034 घरांसाठी 1,41,233 अर्ज आले. तर 2012 मध्ये 2593 घरांसाठी 1 लाख 40 हजार 866 अर्ज आले. यामागाचं एकमेव कारण म्हणजे म्हाडा सर्वसमान्यांना विसरली असून आता खाजगी बिल्डरांशी स्पर्धा करायला लागली असल्याचं नागरीकांचं म्हणणं आहे.
यंदाच्या लॉटरीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटातील घरांच्या किंमती आठ लाखांपर्यंत आहेत. मात्र त्यानंतरच्या घरांच्या किंमती या कल्पनेपलिकडे आहेत. त्यामुळे यंदा एक लाख तरी अर्ज येतील का अशी शंका व्यक्त केली जात आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.