`आदर्श`वरून काँग्रेसनंच केली मुख्यमंत्र्यांची गोची!

आजपर्यंत स्वच्छ प्रतिमा जपलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदर्श अहवाल प्रकरणात काहीसे नाराज झालेत. राहुल गांधी यांनी आदर्शच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं वक्तव्य करुन मिस्टर क्लिन यांना तोंडघशी पाडलंय… तर मुंबई काँग्रेसनंही मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 29, 2013, 11:17 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आजपर्यंत स्वच्छ प्रतिमा जपलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदर्श अहवाल प्रकरणात काहीसे नाराज झालेत. राहुल गांधी यांनी आदर्शच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं वक्तव्य करुन मिस्टर क्लिन यांना तोंडघशी पाडलंय… तर मुंबई काँग्रेसनंही मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिलाय. आदर्शबाबत राहुल गांधींच्या वक्तव्याला मुंबई काँग्रेसनं जाहिर पाठींबा दिलाय. काँग्रेस स्थापना दिनाच्या कार्यक्रमत मुंबई काँग्रेसनं हा ठराव मांडलाय.
‘आदर्श’ प्रकरणात काँग्रेसची प्रतिष्ठा धुळीस मिळाली असताना ऑक्टोबर २०१० मध्ये अशोक चव्हाण यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यात आला. पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. मागील तीन वर्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी जनतेमध्ये आपली प्रतिमा स्वच्छ असल्याचा विश्वास निर्माण केला होता. निवडणुका तोंडावर असताना मुख्यमंत्र्यांची स्वच्छ प्रतिमा हे एकच भांडवल काँग्रेसकडे आहे. मात्र, आदर्श प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांना काँग्रेसने आणि काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी चांगलच अडचणीत आणलंय. भ्रष्टाचाराची टीका होत असताना नक्की करावं काय? याचा गोंधळ काँग्रेसमध्ये असून त्यामुळेच आदर्शबाबत काँग्रेसला घुमजाव करावे लागले आहे.
आदर्श अहवालामुळे अडचणीत आलेल्या अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांना वाचवण्यासाठी आदर्श अहवाल फेटाळण्यात आला. मात्र, तो निर्णय एकट्या पृथ्वीराज चव्हाणांचा निश्चितच नव्हता. दिल्लीतून पक्ष श्रेष्ठींनी सांगितल्यामुळेच त्यांना हा निर्णय घ्यावा लागला, हे उघड आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटला चालविण्याची परवानगी राज्यपालांनी नाकारली. त्यामागे दिल्लीतून सांगण्यात आल्याचीही चर्चा आहे. एकीकडे आदर्शमधून अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांना वाचवण्याचे दिल्लीतून काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडूनच निर्णय झाला... असं असताना राहुल गांधी यांनी आदर्शच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं वक्तव्य करुन स्वच्छ प्रतिमाच्या पृथ्वीराज चव्हाणांना तोंडघशी पाडलंय. या सगळ्यामुळे चव्हाण यांची चांगलीच अडचण झाली असून ते प्रचंड नाराज आहेत. या नाराजीतून पृथ्वीराज चव्हाण काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.