मुंबई : मुंबईकर पाऊस आणि पुराशी झुंज देत असताना राजकीय साठमारी सुरू झाल्याचं चित्र आहे. मुंबईकरांचा वाली होण्यासाठी राजकीय स्पर्धा रंगल्याचं चित्र आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला दौरा रद्द करून थेट महापालिका मुख्यालयातील डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूम गाठली. त्यानंतर अडीच वाजता येणाऱ्या हायटाईडच्या निमित्तानं मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार कंट्रोल रूममध्ये पोहोचले.
तर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा सक्षम असल्याचं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कोल्हापुरातून सांगितलंय. या पावसाच्या निमित्तानं महापालिकेची यंत्रणाच हायजॅक करण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांनी सुरू केल्याचं चित्र दिसलं.
त्यानंतर, शिवसेना नेतेही सक्रीय झाले. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही तातडीनं बीएमसी कंट्रोल रूमकडे धाव घेतली.
दुसरीकडे क्लिव्ह लँडच्या पंपिंग स्टेशनमध्ये उद्भवलेली समस्या सोडवण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांसह स्वतः आदित्य ठाकरे बाह्या सरसावून उतरले. त्यामुळं मुंबईकर तुंबलेल्या पाण्यानं हैराण असताना, शिवसेना-भाजप नेत्यांचं मात्र असं राजकारण रंगलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.