मुलं आणि नातेवाईकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची फिल्डिंग

विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकीकडे मुलाखती देत आहेत. तर दुसरीकडे काही नेते आपली मुले आणि नातेवाईकांसाठी लॉबिंग करत आहेत. त्यामुळं अनेक मतदारसंघात मुलाखती हा केवळ फार्स ठरणाराय.

Updated: Sep 1, 2014, 09:36 PM IST
मुलं आणि नातेवाईकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची फिल्डिंग title=

मुंबई: विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकीकडे मुलाखती देत आहेत. तर दुसरीकडे काही नेते आपली मुले आणि नातेवाईकांसाठी लॉबिंग करत आहेत. त्यामुळं अनेक मतदारसंघात मुलाखती हा केवळ फार्स ठरणाराय.

विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी मुलाखतीला झालेली इच्छूक उमेदवारांची ही गर्दी... नेत्यांसमोर मुलाखत देताना आपणच कसे त्या मतदारसंघात योग्य आहोत, आणि आपल्याला तिकीट मिळालं तर आपण शंभर टक्के निवडून येऊ शकतो, असे दावे हे इच्छूक नेत्यांसमोर करतात. अनेक मतदारसंघात इच्छूकांची संख्या 20 ते 25च्या घरात होती. ही स्थिती प्रत्येक पक्षात आहे. मात्र काही मतदारसंघात इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती हा केवळ फार्स ठरणार आहे. कारण या ठिकाणी नेत्यांनीच आपल्या मुलांसाठी आणि नातेवाईकांसाठी लॉबिंग केलेलं आहे. 

काँग्रेस

- यवतमाळमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आपला मुलगा राहुल ठाकरेंसाठी उमेदवारी मागितली आहे

- नारायण राणेंनी कणकवलीमधून आपले चिरंजीव आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणेंसाठी उमेदवारी मागितली आहे.

- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण खासदार झाल्यानं, आता त्यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपली पत्नी अमिता चव्हाण यांच्यासाठी उमेदवारी मागितलीय.

राष्ट्रवादी काँग्रेस

- राष्ट्रवादीमध्ये मंत्री मनोहर नाईक यांनी आपल्या पुसद मतदारसंघात मुलगा ययाती नाईकसाठी उमेदवारी मागितली आहे

- मंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या काटोल मतदारसंघातून मुलगा सलिल देशमुखसाठी उमेदवारी मागितली आहे

- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातून त्यांची मुलगी अदिती तटकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारे नेत्यांनी आपल्या घराण्याची पुढच्या पिढीची राजकारणाची सोय लावण्यासाठी मोर्चेबांधणी केलीय. यापूर्वी छगन भुजबळ यांनी आपला मुलगा आणि पुतण्याला राजकारणात संधी दिली, गणेश नाईक यांनी आपला पुतण्या आणि मुलाला संधी दिली आहे. शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे, गोपीनाथ मुंडेंची कन्या पंकजा मुंडे, पतंगराव कदम यांचा मुलगा विश्वजित कदम ही राजकारण्यांची मुलं राजकारणात स्थिरस्थावर झालीत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.