www.24taas.com, मुंबई
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर सुरू असलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे ‘मेगा’हाल झाले. याच दरम्यान गर्दीमुळे पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडण्यासाठी ‘झी २४ तास’नं रोखठोक या कार्यक्रमात संबंधितांशी चर्चा केली आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.
या कार्यकमात मध्य रेल्वेचे मुख्य माहिती जनसंपर्क अधिकारी विद्याधर मालेगावकर यांचाही सहभाग होता. ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्यांना आम्ही आर्थिक मदत देऊ शकत नाही, असं मालेगावकरांनी जाहीर केलं होतं. हे ऐकल्यावर ठाण्यातल्या खासदारांनी सबंधित रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन बातचीत केली आणि रेल्वेच्या मध्य रेल्वे महिला समितीकडून या पाचही प्रवाशांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केलीय.
यासंदर्भात आवाज उठवल्याबद्दल ठाण्याच्या खासदारांनी ‘झी २४ तास’चे आभार मानलेत.