www.24taas.com,मुंबई
व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांची अखेर तिस-या दिवशी आर्थर रोड जेलमधून सुटका झालीय. मुंबई हाटकोर्टानं जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची आज सुटका करण्यात आली.
हायकोर्टानं त्यांना जामीन मंजूर करून त्य़ांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. त्रिवेदी यांनीही जामीन घेण्य़ाची तयारी दर्शवलीय. त्यामुळं आज ते जेलबाहेर येतील. मात्र त्यांच्यावरील देशद्रोहाचे आरोप मागे घेण्याबाबतचा निर्णय हायकोर्टानं राखून ठेवला असून त्याबाबत १४सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. राज्य सरकारनंही देशद्रोहाचे आरोप मागे घेण्याबाबत गंभीररीत्या विचार सुरू असून प्रसंगी विधी आणि न्याय खात्याचं मत मागवलं जाणार असल्याचं गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलंय.
व्यंगचित्रकार त्रिवेदींनीही जामीन घ्यायला तयारी दाखवलीय. हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत घेऊन IAC या संस्थेचे सदस्य गृहमंत्री आर. आर. पाटील यांना भेटले. त्यानंतर आज अखेर असीम यांची सुटका झाली.
व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींच्या अटकेनं नवं वादळ निर्माण झालं.. त्यांची व्यंगचित्रं हा देशद्रोह आहे काय, यावरुन नवा वाद निर्माण झालाय.. त्यातच असिम यांनी जामीन घेण्यास नकार देऊन सरकारची अजून कोंडी केली होती. त्यानंतर अखेर मुंबई हायकोर्टानं त्यांना जामीन मंजूर केलाय. आयएसीसह अनेक संघटना त्रिवेदींच्या बाजूनं मैदानात उतरल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत येऊन आर्थर रोड जेलमध्ये असीम त्रिवेंदी भेट घेतली..यावेळी जेलबाहेर आयएसीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
केजरीवालांनी सरकारला धारेवर धरत, सुटकेसाठी शुक्रवारची मुदत दिलीए. त्रिवेंदींविरोधातला देशद्रोहाचा खटला मागे घेतला नाही तर शनिवारपासून आर्थर रोड जेलसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.केजरीवालांच्या या भेटीनंतर आणि एकूणच या वादानंतर, सरकारही थोडं बॅकफूटवर आलं. असीम त्रिवेदींवरील देशद्रोहाचा खटला मागे घेणार असल्याचा विचार सुरू असल्याचं सरकारनं म्हटलं. त्यासाठी विधी व न्याय विभागाकडून अहवाल मागितला असून त्याबाबत कायदेशीर बाबी तपासल्या जात असल्याचं सांगण्यात आलंय.
आता असिम त्रिवेदींना जामीन तर मंजूर झाला, मात्र त्रिवेदींवरील देशद्रोहाचा खटला सरकार मागे घेणार का, याचं उत्तर १४ तारखेला हायकोर्टात सुनावणीवेळीच होणार आहे.