कॅम्पा कोलावासियांनी लढाई थांबवली, करू देणार कारवाई

गेल्या दीड वर्षांपासून आपली घरं वाचवण्यासाठी कॅम्पा कोलावासियांनी सुरू केलेली लढाई अखेर अपयशी ठरलीय. आम्ही विरोध करून आता थकलोय. त्यामुळं आम्ही आमची लढाई थांबवत आहोत, अशा शब्दांत कॅम्पा कोलावासियांनी आपलं दुःख मांडलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 22, 2014, 06:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या दीड वर्षांपासून आपली घरं वाचवण्यासाठी कॅम्पा कोलावासियांनी सुरू केलेली लढाई अखेर अपयशी ठरलीय. आम्ही विरोध करून आता थकलोय. त्यामुळं आम्ही आमची लढाई थांबवत आहोत, अशा शब्दांत कॅम्पा कोलावासियांनी आपलं दुःख मांडलं.
मुंबई महापालिकेच्या कारवाईला आम्ही करत असलेला विरोध आता थांबवला असून, उद्यापासून महापालिका पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई करू शकेल, असं कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी संध्याकाळी मीडियापुढं जाहीर केलं. गेल्या तीन दिवसांपासून कॅम्पा कोलावासीय पालिकेच्या पथकाला विरोध करत होते. मात्र काहीही हाती लागत नसल्यानं त्यांनी अखेर नमतं घेतलं.
आज दुपारी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी कॅम्पा कोलावासीय आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घडवून दिली. मुख्यमंत्र्यांनी जवळपास तासभर कॅम्पा कोलावासियांच्या अडचणी ऐकून घेतल्या, मात्र कोणताही ठोस दिलासा दिला नाही. कॅम्पा कोला रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत कायदेशीर चौकटीत राहून मुख्यमंत्री काही मार्ग काढतील, अशी शेवटची अपेक्षा आता इथल्या नागरिकांना आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.