‘बॉम्बे टू गोवा’... आता जलमार्गानं!

मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मुंबई-गोवा प्रवास आता सागरी मार्गानं प्रवास करण्यात येणार आहे. कारण तब्बल २२ वर्षांनी मुंबई-गोव्यादरम्यान जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 18, 2013, 09:33 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. हा प्रवास आता सागरी मार्गानं प्रवास करण्यात येणार आहे. कारण तब्बल २२ वर्षांनी मुंबई-गोव्यादरम्यान जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. गोवा सरकारकडून यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला असून महाराष्ट्र सरकारकडून त्याला मंजुरी मिळालीय. त्यामुळं आता येत्या तीन महिन्यांत ही सेवा सुरू होणार आहे. ही सेवा सुरू होणार असल्यामुळे मुंबईतला भाऊचा धक्का पुन्हा गजबजून जाईल. माझगावचा भाऊचा धक्का ते पणजी पोर्टपर्यंत ही जलवाहतूक चालवली जाणार आहे. मुंबई-गोवा जलवाहतुकीदरम्यान रायगड, मालवण, रत्नागिरी आणि वेंगुर्ला याठिकाणी स्टॉप देण्यात येणार आहेत.

आत्तापर्यंत रेल्वे किंवा रस्ता मार्गे मुंबई-गोवा प्रवास केला जात होता. मात्र, पावसाळ्यात दरड कोसळून सातत्यानं बंद पडणारा रेल्वे मार्ग आणि मृत्यूचा सापळा बनत चाललेल्या रस्ते मार्गामुळं प्रवाशांचे हाल होत असत. तर विमान खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. मात्र, आता मुंबई-गोवा जलमार्ग सुरू होणार असल्यानं प्रवाशांची चांगलीच सोय होईल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.