मुंबई : रद्दी विकल्यानंतर पैसे मिळाल्याचं आपण ऐकलं असेल पण रद्दी विकण्यासाठी पैसे मोजले असं तुम्ही कधी ऐकलं आहे का ? पण असं घडलंय.
मुंबई महापालिकेत रद्दी विकण्यासाठी तब्बल 10 लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. मनपा कर्मचाऱ्यांनी रद्दी विकण्यासाठी पैसे घेतले नाही तर पैसे मोजले आहेत.
काँग्रेसचे नगरसेवक प्रवीन छेडा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत 2014-15 या वर्षाकरिता मनपाच्या विविध खात्यातील कागदांची रद्दी विकण्यासाठी 10 लाख रूपये खर्च केल्याची माहिती उघडकीस आणली
ई-टेंडरिंगद्वारे रद्दी विकल्यानं 10 लाखांचा खर्च आल्याचं अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. श्रीनिवास यांनी सांगितलं, त्यामुळे स्थायी समितीचे सदस्य अजूनच चिडले. 'रद्दी विकून पैसा मिळतो त्यासाठी पैसा मोजायचा नसतो, रद्दी विकायची आहे असं जाहीर केलं असतं तरी रद्दीवाल्यांची रांग लागली असती' असं प्रवीन छेडा यांनी म्हटलं.
'रद्दी विकायची होती तर लिलाव करायचा होता, ई-टेंडरिंगची काय गरज होती' असा सवाल समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केला. प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.