शिवसेनेला भाजपविरोधात सूर सापडला

आतापर्यंत पीचवर चाचपडत खेळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला अचानक फॉर्म सापडला आणि त्यानं एक दणदणीत फोर मारला. तसंच शिवसेनेचं झालं.  

Updated: Apr 23, 2015, 12:16 AM IST
शिवसेनेला भाजपविरोधात सूर सापडला title=

मुंबई : आतापर्यंत पीचवर चाचपडत खेळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला अचानक फॉर्म सापडला आणि त्यानं एक दणदणीत फोर मारला. तसंच शिवसेनेचं झालं.  

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपच्या भेदक मा-यापुढे शिवसेनेची पुरती दमछाक होत होती, मग ते युती तोडणं असो, विधानसभेत जास्त जागा निवडून येणं असो, प्रचारातली टीका किंवा सत्तेमधला शिवसेनेचा सहभाग ते आतापर्यंत अगदी शिवसेनेच्या मंत्र्यांचे अधिकार. या सगळ्याच ओव्हर्स भाजपनं मेडन टाकल्या. आणि शिवसेनेला निसटत्या धावाही काढता आल्या नाहीत. हा झाला आतापर्यंतच्या टेस्ट मॅचचा भाग. पण क्रिकेटच्या खेळात पीच फिरतं. तसं ते फिरलं.

आणि इतके महिने भाजपसमोर चाचपडत खेळणा-या शिवसेनेला इतक्या महिन्यांनी फॉर्म सापडला. त्याचं श्रेय जातं ते शिवसेनेच्या कॅप्टनला. मुंबईचा डीपी चुलीत घाला, हे वक्तव्य सगळ्यात आधी उद्धव ठाकरेंनी केलं आणि शिवसेनेनं पद्धतशीर स्ट्रॅटेजी आखत डीपीचा चेंडू सतत टोलवत राहील, याची काळजी घेतली. यथावकाश डीपीच्या विरोधात शिवसेनेबरोबर मनसेही रनर म्हणून धावून आली आणि दोघांनी डीपीविरोधात तगडी पार्टनरशिप केली.

शिवसेना आणि मनसे सतत हा आराखडा बिल्डरधार्जिणा असल्याचं अपील करत राहिले, आणि हे वारंवार होणारं अपील खरोखऱच महागात पडेल, याची भीती भाजपलाही वाटायला लागली. मुळात मुंबईच्या डीपीवरुन शिवसेनेला कसं बदनाम करता येईल, याचं भाजपनं चोख प्लॅनिंग केलं होतं. हा डीपी हे महापालिकेचंच पाप असल्याचं पद्धतशीर मार्केटिंग करण्याची योजना होती, पण यावेळी कधी नव्हे ते भाजप मार्केटिंगमध्ये कमी पडलं. 

त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्यांनी आशिष शेलार यांच्याकडून डीपीला विरोध करणारी थोडीफार वक्तव्य करुन घेतली. पण त्यांच्याकडूनही परिणामकारक मारा झाला नाही. डीपीविरोधात वातावरण तापलं असतानाच वांद्रे पोटनिवडणुकीचं निमित्त झालं. तिथे शिवसेनेनं बाजी मारली आणि आत्मविश्वास प्रचंड वाढला. डीपीचा विरोध आणखी तीव्र  झाला, दरम्यानच्या काळात शिवसेना आणि भाजप एकत्र नांदण्यातच फायदा आहे, हे भाजपलाही उमगलं आणि त्यांनीही बाऊनव्सर्स आवरते घेतले. 

मुख्यमंत्र्यांना डीपीच्या विषयावर समिती स्थापन करावी लागली. ओरंगाबाद, नवी मुंबईत युती झाली. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना शिवसेनेचं ऐकावं लागलं. मुंबईचा विकास आराखडा रद्द झाला. आता  ही टेस्ट मॅच अजून रंगतदार होणार आहे. अजून भूसंपादन, जैतापूरसारख्या अवघड ओव्हर्स दोघांनाही खेळायच्या आहेत. त्या खेळताना क्रिकेट इज ए गेम ऑफ जंटलमन हे दोघांनाही लक्षात ठेवावं लागणार आहे. पण सध्या तरी शिवसेना पीचवर आक्रमक होऊनच उतरलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.