'बेस्ट'मधून १६ कर्मचाऱ्यांना नारळ!

वाढत्या तोट्यामुळं बेस्ट कर्मचा-यांची नोकरी धोक्यात येवू लागलीय. त्याची सुरूवात तात्पुरत्या स्वरुपात (टेम्पररी) भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्यापासून झालीय. 

Updated: May 22, 2015, 04:07 PM IST
'बेस्ट'मधून १६ कर्मचाऱ्यांना नारळ! title=

मुंबई : वाढत्या तोट्यामुळं बेस्ट कर्मचा-यांची नोकरी धोक्यात येवू लागलीय. त्याची सुरूवात तात्पुरत्या स्वरुपात (टेम्पररी) भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्यापासून झालीय. 

टेंपररी स्वरूपात काम करणाऱ्या सोळा कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याऐवजी त्यांना थेट कामावरूनच कमी करण्यात आलंय. 

बेस्टनं २०१२ मध्ये विद्युत विभागात मोटार वाहन चालकांची जाहिरात देवून भरती केली होती. त्यानुसार सुरूवातीला टेंपररी स्वरूपात कामावर घेण्यात आले आणि नंतर टप्प्याटप्याने पद रिक्ततेनुसार ४२ जणांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात आली. परंतु त्याच भरती प्रक्रियेतील १६ जणांना मात्र 'कामावर येऊ नका' म्हणून सांगण्यात आल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

या १६ जणांची रितसर भरती होऊन जात पडताळणी झाली आहे. बेस्ट प्रशासनानं त्यांना परिचालन क्रमांक, निवृत्त होण्याचा दिनांक तसंच ओळखपत्रही दिली आहेत. परंतु आता अचानक आर्थिक कारणास्तव कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा हा बेस्ट प्रशासनाचा हा निर्णय धक्कादायक आहे. प्रशासन मात्र आम्ही त्यांना 'ब्रेक' दिला असल्याचं सांगतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.