बँकां, फायनान्स कंपन्यांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या नटवरलालला अटक

अनेक बँकांना आणि फायनान्स कंपन्यांना कोट्यवधी रूपयांना गंडा घालणाऱ्या एका नटवरलालला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. 

Updated: Aug 4, 2015, 11:31 PM IST
बँकां, फायनान्स कंपन्यांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या नटवरलालला अटक title=

अजित मांढरे, मुंबई : अनेक बँकांना आणि फायनान्स कंपन्यांना कोट्यवधी रूपयांना गंडा घालणाऱ्या एका नटवरलालला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. 

सिने अभिनेत्यांचा महागड्या गाड्यांचा शौक तो पूर्ण करायचा. पण बँकांची फसवणूक करून. कसं फुटलं या नटवरलालचं बिंग? पाहूयात हा रिपोर्ट. राहुल राज देशमुख ऊर्फ मिस्टर नटवरलाल. उच्च शिक्षित. बोलबच्चन. मोठ्या लोकांशी ओळखी वाढवायच्या, त्याचा फायदा घेऊन बड्या बँकांना-फायनान्स कंपन्यांना फसवायचा. हा होता त्याचा फंडा.

मर्सिडीज, बीएमडब्ल्यूसारख्या महागड्या गाड्यांच्या खरेदीसाठी २००६ मध्ये राहुलनं आंध्रा बँकेतून साडे सहा कोटींचं कर्ज घेतलं. पण ज्या गाड्यांवर त्यानं कर्ज घेतलं, त्या गाड्याच मुळात अस्तित्वात नव्हत्या. एका कार डिलरच्या मदतीनं त्यानं हे लोन घेतलं. ते दोघेही आता फरार आहेत.

गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळ हा नटवरलाल राहुल, पोलीस आणि सीबीआयच्या हातावर तुरी देऊन वेगवेगळ्या नावांनी देशात राहत होता. याकाळातही त्यानं कोट्यवधींची माया जमवल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.

एकाच गाडीवर किंवा एकाच घरावर दोन बँकांमधून लोन घ्यायचे आणि तिची गाडी किंवा घर खोट्या कागदपत्रांच्या साहय्याने हा राहुल राज देशमुख लोकांना विकायचा. म्हणजे बिना भाडंवली डोकं लावून हा राहुल राज देशमुख कोट्यावधी रुपयांचा पाऊस पाडत होता.

राहुल राज देशमुखच्या जाळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मोठे उद्योगपतीही अडकलेत.खोट्या कागदपत्रांच्या सहाय्यानं त्यानं "क्योंकी सास भी कभी बहू थी" मधील मुख्य पात्राला आणि एका मोठ्या उद्योगपतीला गाड्या विकल्या होत्या.

पोलिसांनी या नटवरलालला ठाण्यातून अटक केली, तेव्हाही त्यानं आपल्या बड्या बड्या ओळखींचा धाक दाखवून, पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. आता परराज्यातल्या त्याच्या पराक्रमांचाही मुंबई पोलीस तपास करतायत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.