बँकेची अजब कर्ज वसूली

सेंट्रल बँकेनं इतिहासात प्रथमच एक अजब गृहकर्ज वसुली केलीय. मालकाचे बुडित गृहकर्ज फ्लॅटचा लिलाव न करताच फ्लॅटमध्ये घुसखोरी करुन राहिलेल्या व्यक्तीकडून वसूल केलंय.

Updated: Jul 15, 2013, 05:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सेंट्रल बँकेनं इतिहासात प्रथमच एक अजब गृहकर्ज वसुली केलीय. मालकाचे बुडित गृहकर्ज फ्लॅटचा लिलाव न करताच फ्लॅटमध्ये घुसखोरी करुन राहिलेल्या व्यक्तीकडून वसूल केलंय. सेंट्रल बँकेत कार्यरत असलेल्या काही उत्तर भारतीय अधिका-यांच्या खाबुगिरीमुळे एका मराठी कुटुंबाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय.

सेंट्रल बँक ऑफ इंडियातील काही उत्तर भारतीय अधिका-यांच्या मनमानी कारभारामुळे अलका गवाणकरांना सध्या प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. गवाणकर कुटुंबियांनी सेंट्रल बँकेचे गृहकर्ज काढून २००४ मध्ये गोरेगाव पश्चिम इथल्या वसंत गॅलक्सीमध्ये फ्लॅट घेतला. परंतु नंतरच्या काळात कर्ज फेडणं त्यांना शक्य झालं नाही. ५२ लाख रुपयांचे बुडित गृहकर्ज वसूल करण्यासाठी बँकेने फ्लॅटच्या लिलावाची पेपरमध्ये जाहिरात दिली. बँकेने फ्लॅटची राखीव किंमत १ कोटी ११ लाख रुपये ठरवली आणि २ एप्रिलला लिलाव करण्याचं जाहीर केलं. परंतु या तारखेपूर्वीच या फ्लॅटमध्ये घुसखोरी करुन राहणाऱ्या श्याम महेश्वरी यांच्याकडून बँकेने ५२ लाख रुपये घेवून कर्जफेड करुन घेतली. म्हणजे गवाणकरांचं गृहकर्ज फ्लॅटचा लिलाव न करताच काही उत्तर भारतीय अधिका-यांनी स्वत:च्या आर्थिक स्वार्थासाठी महेश्वरी यांच्याकडून फेडून घेतलं.

१ कोटी ११ लाखांचा फ्लॅट महेश्वरी यांना ५२ लाखांत देण्यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप गवाणकरांनी केलाय. बँकेच्या अशा कारभारामुळं गवाणकरांना मोठा आर्थिक फटका बसलाय. बँकेच्या कायदेतज्ञांनेही हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवलंय. विशेष म्हणजे ज्य़ा बँकेकडून एका मराठी महिलेवर अन्याय होतोय, त्या बँकेचे अध्यक्ष सध्या मराठीच आहेत. त्यांनी फ्लँटच्या पुर्नलिलावाचे दिलेले आदेशही अधिकारी धाब्यावर बसवतायत. ३१ जुलै रोजी अध्यक्ष मोहन टांकसाळ निवृत्त होण्याची वाट हे कारस्थानी अधिकारी वाट पाहतायत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.