एटीएममधून पैसे काढताना मुंबईकरांनो सावधान!

एटीएमला स्कीमर बसवून पैशांवर डल्ला मारण्याचा प्रकार मुंबईत वाढला आहे. आपण पैसे काढतो, त्या एटीएमला स्कीमर लावलेले तर नाही ना, हे कार्ड स्वॅप करतांना पाहणे आवश्यक आहे.

Updated: Apr 30, 2014, 09:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एटीएमला स्कीमर बसवून पैशांवर डल्ला मारण्याचा प्रकार मुंबईत वाढला आहे. आपण पैसे काढतो, त्या एटीएमला स्कीमर लावलेले तर नाही ना, हे कार्ड स्वॅप करतांना पाहणे आवश्यक आहे.
मुंबईतील बँक ग्राहकांना तात्काळ पैसे मिळावेत, यासाठी एटीएम सुविधा आली खरी, मात्र हीच सुविधा ग्राहकांसह आता पोलिसांना त्रासदायक ठरत आहे. मागील काही दिवसांत भांडुप, आग्रीपाडा आणि काळाचौकी येथील एटीएम सेंटरवर स्कीमर बसवून ‘मास्क टोळी’ने ७०हून अधिक ग्राहकांच्या बचत खात्यांवर डल्ला मारला आहे. मात्र ही टोळी हाती लागत नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
मागील वर्षी डेबिड कार्डचे क्लोनिंग करून एका परदेशी टोळीने चक्क मुंबई पोलिसांचेच पगार गायब केले होते. त्या वेळीच पोलिसांना खरा तर घाम आला होता. त्यात आता आग्रीपाडा, काळाचौकी व भांडुप येथील एटीएम सेंटरवरही स्कीमर लावून विविध बँक खात्यांतून १७ लाखांहून अधिक रक्कम लंपास करणाऱ्या दुकलीने आणखी एका महिलेच्या खात्यावर डल्ला मारल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांचेच डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे.
दरम्यान, कुलाबा येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरच्या चित्रफितीतून या टोळीची मोडस ऑपरेंडी स्पष्ट झाली असली तरी ही टोळी हाती लागत नसल्याने पोलिसांसमोरचा पेच कायम आहे. डेबिट व क्रेडिट कार्ड क्लोनिंग करणाऱ्या परदेशी टोळ्या हे संपूर्ण ऑपरेशन तीन महिने चालवतात.
डेटा कॉपी करण्याकरता लावण्यात येणारा स्कीमर बसवण्यासाठी अवघ्या तीन मिनिटांचा अवधी लागतो. त्यामुळेच या टोळीला अटक करणे पोलिसांना शक्य होत नाही. या टोळीचे सदस्य प्रथम टुरिस्ट व्हिसाच्या आधारे भारतात येतात.
भारतात आल्यानंतर या व्यक्ती शहरातील एटीएम सेंटरमधील मशिनमध्ये स्कीमर आणि छुपा कॅमेरा बसवतात. हा संपूर्ण डेटा कॉपी झाल्यानंतर ही टोळी भारताबाहेर पलायन करते. या डेटाच्या साहाय्याने नवे डेबिट कार्ड तयार करून दोन महिन्यांच्या कालावधीनंतर परदेशातूनच पैसे काढते.
हे पैसे इतक्या सराईतपणे काढले जातात की, पोलिसांच्या हाती त्यांचे धागेदोरेही लागत नाहीत. तर आयपी अॅड्रेसच्या साहाय्याने आरोपीची माहिती मिळवेपर्यंत बराच काळ उलटून जातो. त्यामुळे या टोळीपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी कठीण होते. आता तर या सायबर गुन्ह्यांत स्थानिक गुन्हेगारांनीही शिरकाव केला आहे.
आग्रीपाडा, काळाचौकी आणि भांडुप येथे बसवण्यात आलेले स्कीमर स्थानिक टोळीकडूनच बसवण्यात आले असावेत, असा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात आढळलेली दुकल ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एटीएम सेंटरमधून पैसे काढत आहेत.
या एटीएम सेंटरमध्ये स्कीमर बसवल्यापासून रक्कम काढेपर्यंत प्रत्येक वेळी हे दोघे तोंडाला डॉक्टर वापरत असलेला मास्क लावत असल्याने त्यांची ओळखही पटू शकलेली नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.