www.24taas.com,मुंबई
मुंबईतल्या सीएसटी परिसरात हिंसक तोडफोडीनंतर निर्माण झालेला तणाव निवळलाय. कालच्या हिंसक आंदोलनप्रकरणी 23 जणांना अटक करण्यात आलीये. दरम्यान, या जमावाने महिला पोलिसांची छेडछाड काढून त्यांच्याकडील शस्त्रे हिसकावून घेतली. हल्ल्यात ४५ पोलीस जखमी झाले आहेत.
मुंबईतल्या सीएसटी स्टेशन परिसरात काल झालेल्या हिंसक घटनेनंतर आज परिसरात शांतता आहे. परिस्थिती निवळलीये. मुंबईकर नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागलेत. या हिंसक आंदोलनानंतरही मुंबईकरांनी पुन्हा एकदा संयम दाखवत मुंबई स्पिरीट दाखवून दिलंय. काल झालेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी पोलिसांनी 23 जणांना अटक केलीये. तर शनिवारी रेल्वेतही महिलांच्या डब्यात हा जमाव घुसला होता. त्याठिकाणीही धुडगूस घालता. मात्र, त्यांच्यावर कारवाई पोलिसांनी केली नसल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काल मुंबईत सीएसटी परिसरात अशांतता निर्माण झाली होती. आज मात्र मुंबईतलं जनजीवर सुरळीत सुरूय..कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काल आसाम आणि म्यानमारमधल्या हिंसेचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानमध्ये रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत पन्नास हजारांपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. मात्र चारच्या सुमारास अचानक हिंसाचाराला सुरूवात झाली.
मीडियाची ओबी व्हॅन्स आणि पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आलं. या गोंधळाच्या स्थितीत झालेल्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झालाय, तर ५५ जण जखमी झालेत. ५५ जखमींमध्ये ४५पोलिसांचा समावेश आहे. तसंच बेस्टच्या अकरा बसेस जाळण्यात आल्या तर २५ बसेसची तोडफोड करण्यात आली. हा हिंसाचार उत्स्फूर्त की पूर्वनियोजित याची चर्चा आता सुरू झालीय. दरम्यान या घटनेनंतर मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांनी दिलीय.