www.24taas.com,मुंबई
२६/११ या मुंबई हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्यात आल्याने खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. हिच माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे, असे शहीद झालेले पोलीस अधिकारी विजय साळसकर यांची पत्नी स्मिता साळसकर यांनी सांगितले.
अजमल कसाबला पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे देशभर आनंद साजरा करण्यात येत आहे. कसाबला फाशी होईल की नाही, याविषयी शंका होती. पण, आज त्याला फासावर लटकविण्यात आल्याने मला आनंद होत असल्याचे, स्मिता साळसकर यांनी सांगितले.
या हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानमध्ये बसले असून, त्यांना शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यांना शिक्षा झाल्याशिवाय समाधान मिळणार नाही. कसाबच्या फाशीमुळे पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे, असे त्या म्हणाल्या.
कसाबच्या फाशीमुळे जगात एक चांगला संदेश गेला आहे. त्यामुळे आनंद आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमची एकच मागणी होती की कसाबला फाशी द्या, ती आज पूर्ण झाली आहे, असे साळसकर म्हणाल्या.
तसेच संसद हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरूलाही लवरात लवकर फाशी दिली पाहीजे. तर कसाबच्या दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळल्याने त्यांचे अभिनंदन करायला हवे, असे स्मिता साळसकर म्हणाल्यात.