www.24taas.com, मुंबई
एअर इंडियाचे मुख्य कार्यालय मुंबईतून हलविले जाणार आहे. आता हे मुख्यालय दिल्लीत असेल, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाणमंत्री अजित सिंग यांनी दिली. याचवेळी या निर्णयाला कोणीही विरोध करू नये, असे आवाहन त्यांनी केलेय.
एअर इंडियाची सध्याची परिस्थितीत पाहता, ही कंपनी टिकविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दिल्लीला कार्यालय नेण्याच्या या निर्णयाला कोणत्याही पक्षाकडून विरोध होणे अपेक्षित नाही. एअर इंडियाचे मुख्यालय दिल्लीला हलविण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. असे असले तरी या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे अजित सिंग यांनी स्पष्ट केले. दरम्यान, एअर इंडियाचे कार्यालय मुंबईतून दिल्लीला हलविण्यास शिवसेनेचा विरोध असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईतील कार्यालयातील सरसकट सर्व कामगारांना दिल्लीला हलविण्यात येणार नाही. केवळ व्यवस्थापकीय पदावरील अधिकाऱ्यांनाच दिल्लीला पाठविले जाणार आहे, असे अजित सिंग यांनी सांगितले. यावेळी राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया उपस्थित होते.
केंद्र सरकारने विमान उड्डाण क्षेत्रात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमुळेच टाटा कंपनीने ‘टाटा एअर एशिया`चा प्रकल्प सादर केला, असा दावा यावेळी सिंग यांनी केला. अशा प्रकल्पांमुळे भारतीय विमान सेवा नव्याने भरारी मारेल, असा विश्वाकस त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नवी मुंबई विमानतळासाठी ७० टक्के जमीन सरकारने ताब्यात घेतली आहे. या विमानतळाचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी दिली. शिवडी- न्हावा शेवा सागरी सेतूसाठी या वर्षअखेरीस निविदा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.