मोबाईल सीमकार्डचा `आधार`....

आता यापुढे तुम्हाला मोबाईलसाठी नवं सीमकार्ड खरेदी करायचं असेल तर तुमचं आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र सादर करावं लागणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 10, 2012, 05:50 PM IST

www.24taas.com, मुंबई
आता यापुढे तुम्हाला मोबाईलसाठी नवं सीमकार्ड खरेदी करायचं असेल तर तुमचं आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र सादर करावं लागणार आहे.
बनावट सीमकार्डचा सुळसुळाट रोखण्यासाठी आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्राशिवाय सीमकार्ड न विकण्याचा निर्णय सेल्युलर कंपन्यांनी घेतलाय. कंपनीच्या या निर्णयामुळे सीमकार्ड विक्री करणारे अनेकजण अडचणीत सापडले आहेत. पूर्वी सीमकार्ड मिळविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, राष्ट्रीयीकृत बँक पासबुक, पॅनकार्ड, इतर शासकीय दस्तऐवजदेखील चालायचे. त्यामुळे मोबाईल वापरणारे अनेकजण पाच ते दहापर्यंत सीमकार्ड ठेवत असत.
‘अॅडव्हायजरी कौन्सिल फॉर टेलिकॉम इन इंडिया’ने आखून दिलेले अॅक्टच्या अटी राज्यभरात धाब्यावर बसविण्यात आल्या आहेत. पोस्टपेड सीमकार्डसाठी जेवढी दक्षता घेतली जाते, तेवढी दक्षता प्रिपेड सीमकार्ड देताना घेतली जात नसल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे विविध कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बनावट सीमवर प्रतिबंध लावण्यासाठी नियम कठोर केलेत. आता आधार किंवा इलेक्शन कार्डाशिवाय सीमकार्ड न देण्याचा निर्णय घेतल्याने अनेकजण अडचणीत सापडले आहेत.