अॅसिड हल्ला : अखेर प्रीतीची मृत्यूशी झुंज संपली

गेल्या महिन्यात वांद्रे टर्मिनसवर झालेल्या अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या अवघ्या २३ वर्षांच्या प्रीती राठी हिचा अखेर मृत्यू झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 1, 2013, 05:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या महिन्यात वांद्रे टर्मिनसवर झालेल्या अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या अवघ्या २३ वर्षांच्या प्रीती राठी हिचा अखेर मृत्यू झालाय. हल्ल्यानंतर तिची प्रकृती स्थिर होती परंतू गेल्या आठवड्यापासून तिची अवस्था गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती.
दिल्लीहून नौदलाच्या हॉस्पिटलमधील नोकरीवर रुजू होण्यासाठी मुंबईत आलेल्या प्रीती हिच्यार २ मे रोजी अज्ञात तरुणाने अॅसिड हल्ला केला होता. या हल्ल्यात प्रीतीच्या एका डोळ्याला दुखापत झाली होती, तर अॅसिडचे काही थेंब तोंडातही गेल्याने अन्ननलिकेला मोठ्या प्रमाणावर इजा पोहोचली होती. ‌तिच्यावर भायखळ्याच्या मसीना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, पुढील उपचारांसाठी आवश्यक असलेल्या कार्डिओ थोरॅसिक सर्जरीची सुविधा या हॉस्पिटलमध्ये नसल्याने तिला १८ मे रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं होतं. त्यानंतर ती व्हेन्टिलेटरवरच होती. अॅसिडमुळे तिच्या शरिरातला एकेक अवयव निकामी होत गेला आणि अखेर आज तिची मृत्यूशी झुंज संपली.

कुलाबा येथील मेडिकल कॉलेजमधील लेफ्टनंट पदासाठी देशभरातून १५ मुलींची निवड झाली होती; त्यात प्रीतीचाही समावेश होता. प्रीतीवर अॅसिड हल्ला करणाऱ्या तरुणाचा अजूनही पोलीस शोध घेऊ शकलेले नाहीत.