मुंबई : 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले ब्रिटीश नागरिक विल पाईक यांना नुकसान भरपाई मिळाली आहे.
हल्ल्यामध्ये जखमी झाल्यानंतर ताज महाल हॉटेलनं आपलं संरक्षण केलं नाही असा आरोप करत विल यांनी कोर्टात धाव घेतली, आणि ताज हॉटेलनं विल यांना नुकसान भरपाई द्यायचे आदेश दिले. 26/11 हल्ल्यामध्ये एका प्रायव्हेट कंपनीनं जखमीला नुकसान भरपाई द्यायची ही पहिलीच वेळ आहे. पण विल पाईक यांना किती नुकसान भरपाई मिळाली हे मात्र गुप्त ठेवण्यात आलंय.
26/11 च्या हल्ल्यावेळी विल पाईक आपल्या मैत्रिणीसोबत ताज हॉटेलमध्ये होते. स्वत:चा दहशतवाद्यांपासून बचाव करत असताना 50 फूट खाली पडले, यात त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना पॅरलिसिसही झाला.
यानंतर पाईक यांनी ताज ग्रुपकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती, पण ही मागणी पूर्ण न झाल्यानं पाईक यांनी लंडन कोर्टामध्ये धाव घेतली, आणि कोर्टानं नुकसान भरपाई द्यायचे आदेश दिले. लंडन कोर्ट भारतात झालेल्या हल्ल्याची नुकसान भरपाई मागण्याच्या कार्यक्षेत्रात येत नाही, असा दावा ताज हॉटेलनं केला होता. पण हा दावाही लंडन कोर्टानं फेटाळला.
ताज ग्रुपनं मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीये. या हल्ल्यात अनेकजण बाधित झाले, पण यामध्ये ताजच्या मालकांची काहीच चूक नाही, अशी प्रतिक्रिया ताज हॉटेलनं दिलीये.