www.24taas.com, मुंबई
रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी... घटस्थापनेच्या मुहूर्तावर आजपासून मध्य रेल्वेतर्फे १५ डब्यांच्या लोकल सुरू होत आहेत. यामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय वेळापत्रकात बदल करण्यात आलाय.
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार कालपासूनच १५ डब्यांची लोकल सुरू करण्यात येणार होती. मात्र, सर्वपित्री अमावस्या असल्याने हा मुहूर्त पुढे ढकलावा, अशी मागणी रेल्वेच्याच काही अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे धरल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे या नव्या गाडीचा मुहूर्त आज होतोय.
नव्या तीन डब्यांमध्ये महिलांसाठी एक साधारण डबा, प्रथम वर्गासाठी एक आणि दुसऱ्या वर्गाचा साधारण डबा यांचा समावेश आहे. तांत्रिक अडचणी असल्याचं रेल्वे कर्मचाऱ्यांनी अगोदर सांगितले होतं. पण, आज संध्याकाळी साडेसात वाजता ही नवी १५ डब्यांची गाडी कल्याणसाठी रवाना होणार आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण ही १५ डब्यांची सेवा सुरू करण्यात आलीय. दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली कल्याण अशा रेल्वे स्थानकांवर या लोकलच्या दिवसाला १४ फेऱ्या होतील, असं वेळापत्रक तयार करण्यात आलंय.