www.24taas.com, मुंबई
गेल्या काही दिवसांपासूनची गुन्हेगारीची आकडेवारी पाहिली तर अत्याचारांना बळी पडलेल्या पीडितांमध्ये स्त्रियांची संख्या कमालीची आढळून येईल. त्यासोबतच भारतीय समाजात स्त्रियांना दिला जाणारा दुय्यम दर्जा हा विषय पुन्हा एकदा प्रकर्षानं पुढे येतोय. शिक्षण, सुरक्षितता, करिअर, कुटुंब आणि समाजातील स्थान या सर्वच आघाड्यांवर मुलींना दुय्यम दर्जा दिला जात असलेला आपल्याला माहित आहे. पण, आता हे प्रमाण औषधोपचारांच्या बाबतीत असल्याचं पुढे यंतय. टाटा हॉस्पीटलच्या एका सर्वेक्षणातून ही धक्कादायक बाब उघड झालीय.
कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार करून घेण्यासाठी हजारो लोक टाटा हॉस्पीटलमध्ये दाखल होतात. पण, हे प्रमाण प्रत्येक तीन मुलांमागे केवळ एक मुलगी अशा गुणोत्तरात असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतंय. दिल्लीमध्ये तर हे प्रमाण प्रत्येक सात मुलांमागे एक मुलगी इतकं व्यस्त असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. मुलीच्या उपचारांवर एवढे पैसे खर्च का करायचे? असा प्रश्न कॅन्सरसारखा आजार असलेल्या मुलीच्या पालकांना पडतो, शिवाय लोक काय म्हणतील, तिला कॅन्सर असल्याचं कळल्यावर तिच्या आणि तिच्या भावंडांच्या लग्नात अडथळे येतील अशी मानसिकता या पालकांची असते त्यामुळे तिला उपचारांपासून दूर ठेवलं जात असल्याचं टाटा हॉस्पीटलच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे.
गरजू पेशंट्सवर वेळप्रसंगी मोफत उपचारही इथं केले जातात पण, खोट्या मानापमान आणि खर्चाच्या भयापायी लोक पुढं येणं टाळतात’ असं डॉक्टरांनी म्हटलंय. जागतिक पातळीवर बालकांतील कॅन्सर बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत आहे . भारतात हेच प्रमाण सध्या७० ते ७५ टक्क्यांदरम्यान आहे. प्रौढांमधील कॅन्सरचे शारीरिक आणि सामाजिक परिणाम आणि बालकांमधील कॅन्सर यात खूप अंतर असतं. त्यामुळेच या समस्येकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय.