रेल्वे स्टेशन नाही उणे, त्यावर सरकते जिने

मुंबईकर चाकरमान्यांसाठी चांगली आणि महत्त्वाची बातमी. मुंबईतल्या स्टेशन्सवर आता एस्कलेटर्स म्हणजेच सरकते जिने बसवले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना ट्रेन पकडणं सोपं जाईल, असा दावा केला जातो आहे.

Updated: Jan 20, 2012, 10:23 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईकर चाकरमान्यांसाठी चांगली आणि महत्त्वाची बातमी. मुंबईतल्या स्टेशन्सवर आता एस्कलेटर्स म्हणजेच सरकते जिने बसवले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना ट्रेन पकडणं सोपं जाईल, असा दावा केला जातो आहे. पण मुंबईकरांची रोजची धावपळ पाहता, हे जिने खरंच उपयोगी ठरणार का, याबद्दल वेगवेगळी मतं आहेत.

 

मुंबईकरांना आता रोजची लोकल पकडायला धावावं लागणार नाही. कारण मुंबईकरांचं वेगाशी असलेलं गणित लक्षात घेऊन आता रेल्वे स्टेशन्सवर एस्कलेटर्स अर्थात सरकते जिने बसवले जाणार आहेत.मध्य रेल्वेच्या दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या स्टेशन्सवर तर पश्चिम रेल्वेच्या अंधेरी,गोरेगाव आणि बोरिवली या स्टेशन्सवर एकूण ३१ सरकते जिने बसवण्याची योजना आहे.

 

यातल्या ८ सरकत्या जिन्यांचं काम जुलै २०१३ पर्यंत पूर्ण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मध्ये रेल्वेच्या दादर स्टेशनवर दोन, ठाणे दोन, कल्याण २ आणि पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि बोरिवली स्थानकांवर प्रत्येकी एक सरकता जिना बसवण्याचं काम जुलै २०१३ पर्यंत पूर्ण करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. एमआरव्हीसीने मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टअंतर्गत ही योजना आखण्यात आली आहे.

 

एका सरकत्या जिन्यासाठी रेल्वेला ७५ लाख मोजावे लागणार आहेत. २०१४ पर्यंत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. एका सरकत्या जिन्यावरुन एका तासात नऊ हजार लोक वर-खाली करु शकणार आहेत. प्रदुषित वातावरणाचा किवा मुसळधार पावसाचाही या सरकत्या जिन्यांवर परिणाम होणार नाही असं संगण्यात येतं आहे. पण मुंबईवर असलेला लोकसंख्येचा अतिरिक्त भार, मुंबईकरांची धावपळ, अस्वच्छता आणि बेशिस्त या सगळ्यामुळे सरकते जिने कितपत मदतीचे ठरणार याबद्दल शंका व्यक्त करण्यात येते आहे.