www.24taas.com, मुंबई
काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आज मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या भेटी दरम्यान राहूल गांधी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात झाडाझडती घेणार असल्याचे वृत्त आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपालिका निवणुकांच्या निकालांचा आढावा ते घेणार आहेत.या निवडणुकांमध्ये काँग्रेसला राष्ट्रवादीनं मात दिल्यानं प्रदेश काँग्रेसच्या कामगिरीची हायकमांडनं गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळंच राहुल गांधी आणि प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश हे आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
माटुंग्याच्या इंडियन जिमखान्यात दुपारी ३ वाजता होणाऱ्या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि काँग्रसचे अनेक ज्येष्ठ मंत्री आणि नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कोणाला टार्गेट केले जाईल, याची कुजबूज सुरू आहे. उत्तप प्रदेश निवडणुकीत पराभव जिव्हारी लागल्याने राहुल गांधी भडकले होते. त्यांनी स्थानिक नेतृत्वाला जबाबदार धरले होते. हवेत चालणारे नेते नकोत, अशी तंबी नेत्यांना दिली होती. त्यामुळे मुंबईत ते काय निर्णय घेतात, याची उत्सुकता आहे.