राज ठाकरे संगमांना द्या पाठिंबा- खडसे

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पी.ए. संगमा यांनाच पाठिंबा द्यावा, अशी विनंती भाजपचे नेते राज ठाकरे यांना करणार आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज संगमा यांच्या उपस्थितीतच ही माहिती दिली.

Updated: Jul 10, 2012, 07:03 PM IST

www.24taas.com, मुंबई

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पी.ए. संगमा यांनाच पाठिंबा द्यावा, अशी विनंती भाजपचे नेते राज ठाकरे यांना करणार आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज संगमा यांच्या उपस्थितीतच ही माहिती दिली.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक रिंगणात उतरलेले यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी आणि भाजप-अण्णा द्रमुक-बिजू जनता दलपुरस्कृत पी.ए.संगमा यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून संगमा यांनी आज महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची भेट घेतली.

एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी त्यांना प्रदेश भाजपच्या कामकाजाविषयी माहिती दिली. तिथून संगमा विधानभवनाकडे रवाना झाले आणि भाजप आमदारांना भेटले.

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले की, मनसेच्या आमदारांनी राष्ट्रपती निवडणुकीत संगमांना मत द्यावं यासाठी मी स्वतः राज ठाकरेंना विनंती करणार आहे.  शिवसेनेने यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला आहे.

शिवसेनेने प्रणवदांना पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांनी शिवसेनेवर आगपाखड केली होती. त्यामुळे राज ठाकरे शिवसेनेच्या विरोधी भूमिका घेतील अशी शक्यता आहे. त्यामुळे भाजप नेते राज ठाकरेंची मन वळवण्याच्या प्रयत्नात आहे.

Tags: