www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात खटला दाखल करणार येणार आहे. अॅडव्होकेट जनरल डी. जे. खंबांटांनी यांनी राज ठाकरे यांच्यावर खटला दाखल करण्याची परवानगी दिली आहे. राज ठाकरे यांनी कोर्टाच्या अवमान केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात येणार आहे. शिवाजी पार्कवर सभा घेण्याप्रकरणी कोर्टाने राज ठाकरेंना परवानगी नाकारली होती. आणि त्यासाठीच राज ठाकरेंनी न्यायालयावर टीका टिप्पणी केली होती.
निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांना शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी एका दिवसाची परवानगी देणार नसतील तर काय झक मारायला घ्यायच्या निवडणुका. बंद करून टाका या निवडणुका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. राज्य सरकार सांगते तसा निकाल हायकोर्टकडून दिला जातो. हायकोर्ट किंवा निवडणूक आयोग या संस्थांकडून पारदर्शक कारभार व्हावा, ही अपेक्षा असते, मात्र तो होत नाही, याबद्दल कोणी बोलू नये का, ही काय मोगलाई आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी हा मुद्दा लक्षात घेऊन सभेला परवानगी द्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. न्यायदेवतेच एक पारडं एका बाजूला झुकलेलं आहे, अशी टीप्पणी राज ठाकरे यांनी यावेळी केली होती. हायकोर्टाने आम्हांला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी नाकारली, पण सभा कुठे घ्यायच्या हे सांगितले नाही. शिवाजी पार्कवर घेऊ नये, आझाद मैदानावर घेऊ नये, गिरगाव चौपाटीवर घेऊ नये अशी बंधन लादतात.
सांगतील एमएमआरडीए मैदानावर घ्या, अरे कुणी कुत्रं तरी येतं का या ठिकाणी असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला होता. शांततेच्या मार्गाने निवडणुका व्हाव्यात असे आम्हांलाही वाटते, मात्र, अशी आडकाठी करून शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.