www.24taas.com, मुंबई
राज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मंत्रालयाच्या इमारतीमध्ये स्प्रिंकलर यंत्रणा नसल्यामुळे आग नियंत्रणात येण्यास वेळ लागल्याचे अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
कोणत्याही इमतारतीमध्ये फायर डिटेक्शन आणि फायर प्रिव्हेन्शन यंत्रणा असणे गरजेचे आहे . मंत्रालयामध्ये फायर डिटेक्शन यंत्रणा होती . मात्र प्रिव्हेन्शन यंत्रणा नव्हती . शहरातील उंच आणि महत्त्वाच्या इमारतींमध्ये स्प्रिंकल यंत्रणा असणे गरजेचे असल्याचा निर्णय २००५ मध्ये घेण्यात आला होता. मात्र, ही यंत्रणा मंत्रालयात लावण्यात आली नव्हती. स्प्रिंकलर यंत्रणा म्हणजे आगीमुळे निर्माण होणाऱ्या या उष्णतेने तेथे लावण्यात आलेला बल्ब फुटतो आणि पाण्याचे फवारे बाहेर येण्यास सुरूवात होते. यामुळे आग विझली असती असे म्हणता येणार नाही मात्र तिची तीव्रता कमी झाली असती, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
.
मंत्रालयात मोठ्या प्रमाणावर कागद आणि लाकडी फर्निचर असल्यामुळे तेथे अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम असणे अपेक्षित आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यांनाही अशा परिस्थितीत कोणत्या उपाययोजना करायच्या याबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे . ही आग शॉर्टसर्किटने लागली असा प्राथमिक अंदाज आहे . अशा वेळी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण असते तर त्यांनी आग छोटी असतानाच ती विझवण्याचाप्रयत्न केला असता आणि एवढा मोठा आगडोंब उडाला नसता , असेही तज्ज्ञांचे मत आहे .