www.24taas.com, मुंबई
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर जाहीर बोलू नका असा धमकीवजा इशारा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांना शिवसेनेनं दिला आहे. शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर काकोडकरांनी जैतापूर विषयावर बोलणं टाळलं आहे.
पुण्यातल्या ‘आघारकर इंस्टिट्यूट’मध्ये काकोडकरांचं व्याख्यान होतं. या व्याख्यानात त्यांनी जैतापूर प्रकल्पाचा उल्लेख टाळला. शिवाय रत्नागिरीतल्या ‘राजापूर हायस्कूल’मध्ये आयोजित करण्यात आलेलं त्यांचं व्याख्यानही रद्द करण्यात आलं आहे. शिवसेनेच्य़ा कार्यकर्त्यांनी संबधित संस्थांना काकोडकर यांनी जैतापूर विषयाचं समर्थन करु नये असं निवेदन दिलं होतं. यामुळं काकोडकर यांनी पुण्यातल्या कार्यक्रमात जैतापूर विषयावर बोलण्याचं टाळलं तर रत्नागिरीतलं व्याख्यानच रद्द करण्यात आलं.
उद्धव ठाकरेंना यासंदर्भात विचारलं असता जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हीच मोठी धमकी असल्याचं वक्तव्य शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शिवसेनेचा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध आणखी तीव्र झाल्याचं स्पष्ट झालयं. दरम्यान काकोडकर यांना दिलेल्या धमकीवजा इशाऱ्याबाबत नेमकी माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या या धमकीमुळे काकोडकरांसारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञाच्या व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न झाल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे.