जावयाचा 'कारनामा'.. नर्सना लाविले 'कामा'

मि. क्लिन अशी प्रतिमा जपणारे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपल्या आजारी आणि वयोवृद्ध सासूबाईंच्या दिमतीला सरकारी हॉस्पिटलमधील नर्सेसना ' कामाला लावले आहे

Updated: Oct 11, 2011, 12:06 PM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई

 

आदर्श घोटाळ्यात आपल्या सासूबाई भगवती शर्मा यांना आलिशान फ्लॅट मिळवून दिल्याने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण गोत्यात आले होते... आता मि. क्लिन अशी प्रतिमा जपणारे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपल्या आजारी आणि वयोवृद्ध सासूबाईंच्या दिमतीला सरकारी हॉस्पिटलमधील नर्सेसना ' कामा' ला लावल्याने ' जावई माझा भला ' चा नवा प्रयोग रंगला आहे.

 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सासूबाई वर्षा निवासस्थानी त्यांच्यासोबत राहतात. माँसाहेब म्हणून ओळखल्या जाणा-या सासूबाई सध्या स्नायूदुखीने हैराण असून, वॉकरशिवाय त्यांना चालता येत नाही. अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेण्यासाठी खासगी परिचारिकांची नेमणूक करण्याऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पदाचा वापर करत, कामा आणि आल्बलेस या सरकारी हॉस्पिटलमधील नर्सेसनाच सासूबाईंच्या दिमतीसाठी ‘ कामा ’ ला लावले आहे.

 

 

[caption id="attachment_1947" align="alignleft" width="300" caption="मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण"][/caption]

गेल्या ५ ऑक्टोबरपासून दररोज तीन नर्सेस मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांच्या सासूबाईंची काळजी घेण्यासाठी जात आहेत. सासूबाईंना वेळच्या वेळी औषधे देणे, त्यांना चालण्यासाठी मदत करणे आणि ब्लडप्रेशर तपासणे अशी कामे त्यांच्यावर सोपवण्यात आली आहेत. खेदाची बाब म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये आधीच कर्मचारी संख्या अपुरी असताना, मुख्यमंत्र्यांच्या घरी नर्सेसची सक्तीची ड्युटी लावण्यात आल्याने कामातील नर्सेसमध्ये संताप व्यक्त होत आहे.

 

कामा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. राजश्री कटके यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हॉस्पिटलच्या डीननी आम्हाला तसे आदेश दिले आहेत आणि त्या आदेशांचे पालन करण्याशिवाय आम्हाला काही पर्याय नाही. मुख्यमंत्र्यांच्या आजारी सासूबाईंची काळजी घेण्यासाठी नर्सेसना काही दिवसांपासून त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. कटके यांनी दिली.