मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्यासंदर्भात तिढा सुटला. मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षावर जवळपास अडीच तासांच्या बैठकीनंतर आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने ६५ जागांची मागणी केली होती पण ५८ जागा दिली जाण्याची शक्यता आहे. अखेर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याने शिवसेना समोर मोठं आव्हान उभं ठाकणार आहे.
मागच्या वेळेस अवघ्या एका जागेवरून आघाडी होऊ शकली नव्हती. कुर्ला येथील राजहंस सिंग यांच्या प्रभागावरून आघाडी तुटली होती.
थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. गेले काही दिवस आघाडी होणार की नाही याबाबतीत प्रश्न चिन्हं निर्माण झालं होतं.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गुरुदास कामत यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून आघाडी करणं काँग्रेसच्या दृष्टीने नुकसानीचं ठरेल असं कळवलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत आघाडीच्या निर्णया संदर्भात सोनिया गांधींची भेट घेतली होती. शरद पवारांनीही काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला होता आणि लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगितलं होतं.
[jwplayer mediaid="27006"]