खड्ड्यांवरून भाजपाचा शिवसेनेला घरचा आहेर

मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिकेनं तयार केलेली पॉटहोल्स ट्रेसिंग सिस्टिम अयशस्वी ठरल्याची टीका पालिकेतील भाजप गटनेता दिलीप पटेल यांनी केली आहे. या सिस्टिमद्वारे ज्या खड्डयाचे फोटो काढलेत तेच खड्डे बुजवले जात आहेत.

Updated: Jul 24, 2012, 10:52 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिकेनं तयार केलेली पॉटहोल्स ट्रेसिंग सिस्टिम अयशस्वी ठरल्याची टीका पालिकेतील भाजप गटनेता दिलीप पटेल यांनी केली आहे. या सिस्टिमद्वारे ज्या खड्डयाचे फोटो काढलेत तेच खड्डे बुजवले जात आहेत. त्यामुळे मुंबईकराच्या डोळ्यात धुळफेक केली जात असल्याचा आरोप भाजप गटनेत्यांनी केला आहे. भाजपच्या या टीकेमुळे पालिकेतील शिवसेनेला घरचा आहेर मिळाला आहे.

 

मुंबईत 7 हजार खड्डे असल्याचं मुंबई महापालिकेच्या पॉटहोल्स ट्रेसिंग सिस्टिमद्वारे उघड झालयं. या सिस्टिमसाठी पालिकेनं ज्युनिअर इंजिनिअरसाठी 10 लाखांचे तब्बल 110 एन्ड्रॉयड मोबाईल विकत घेतले. या मोबाईलद्वारे पालिकेचे हे इंजिनिअर आणि कंत्राटदार खड्डयांचे फोटो काढतात. मात्र ते ज्या खड्डयांचे फोटो काढतात तेच खड्डे बुजवले जाताएत अशी तक्रार पालिकेतील भाजप गटनेता दिलीप पटेल यांनी केलीय. त्यामुळे शहरातील त्याच रस्त्यांवरचा दुसरा खड्डा बुजवला जात नाही. त्यामुळे पॉटहोल्स ट्रेसिंग सिस्टिम अयशस्वी ठरल्याची टीका दिलीप पटेल यांनी केली आहे. भाजपच्या टीकेनंतर पालिकेतील विरोधा पक्षनेत्यांनी ही सिस्टिम रद्द करावी अशी मागणी केली.

 

भाजपच्या या टीकेमुळे शिवसेनेनं सावध पवित्रा घेतला आहे.  सिस्टिममध्ये चूक असेल तर दुरूस्त करून दिलीप पटेलांच्या तक्रारीची दखल घेतली जाईल असं आश्वासन महापौरांनी दिलं. पालिकेनं 5 वर्षात खड्डे बुजवण्यासाठी शंभर कोटी खर्च केलाय. मात्र पालिकेचा हा खर्च फुकट जात असल्याचं पॉटहोल्स ट्रेसिंग सिस्टिमच्या अयशस्वीपणामुळे उघड झालयं. त्यामुळे करदात्या मुंबईकरांच्या पैशांची मात्र उधळपट्टी होते.