www.24taas.com, मुंबई
मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब यांची आर्थर रोड करागृहात पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. सौदी अरेबियाहून प्रत्यार्पण करून आणलेल्या अबू जिंदाल याने केलेल्या खळबळजनक खुलाशांची शहानिशा करण्यासाठी कसाबची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी राज्य सरकारकडे परवानगीसाठी पत्र पाठविले असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
२६/११च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान कराची येथील कंट्रोल रूममध्ये बसून कसाब आणि त्याच्या साथीदारांना आदेश देण्याचे काम अबू जिंदाल करीत होता. सौदी अरेबियाहून त्याचे हिंदुस्थानात प्रर्त्यापण केल्यानंतर जिंदाल याला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रॅन्चच्या ताब्यात देण्यात आले. चौकशीमध्ये अबू याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. कसाब आणि त्याच्या साथीदारांना जिंदाल यानेच हिंदी शिकवले होते. चार हिंदुस्थानी नागरिक पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाचे प्रशिक्षण घेत असल्याचे जिंदाल याने म्हटले आहे.
या सर्व बाबींची शहानिशा करण्यासाठी कसाब याची पुन्हा चौकशी करण्यात येणार असल्याचे क्राइम ब्रॅन्चच्या अधिकार्याने सांगितले. कसाब सध्या आर्थर रोड कारागृहात अंडासेलमध्ये आहे. त्याची चौकशी करण्यासाठी गृहविभागाच्या परवानगीची गरज आहे. त्यामुळे परवानगीसाठी राज्य सरकारला पत्र लिहिण्यात आल्याचे या अधिकार्याने सांगितले. विशेष म्हणजे चौकशीदरम्यान गरज भासल्यास जिंदालला कसाबच्या समोर आणण्यात येणार आहे.