'आदर्श'ची कागदपत्रे सुरक्षित?

महाराष्ट्राच्या मंत्रालयाला आज दुपारी लागलेल्या आगीत वादग्रस्त आदर्श सोसायटीचे कागदपत्रही जळाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

Updated: Jun 21, 2012, 06:38 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

महाराष्ट्राच्या मंत्रालयाला आज दुपारी लागलेल्या आगीत वादग्रस्त आदर्श सोसायटीचे कागदपत्रही जळाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत  होती. मात्र, नगर विकास खात्याचे कार्यालय जळाली असली तरी आदर्श घोटाळ्याच्या सर्व फाईल्स सीबीआयच्या ताब्यात असल्याने ती सुरक्षित असल्याचं कळतं.

 

नगर विकास खात्याचं कार्यालय जळाल्याने आदर्श घोटाळ्यातील कागदपत्रे जळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. पण सध्या, आदर्श घोटाळ्याच्या सर्व फाईल्स सीबीआयच्या ताब्यात  आहेत, त्यामुळे त्या सुरक्षित असल्याचं समजतंय.

 

आज दुपारी मुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागलीय. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समजतंय. २४ जण या आगीत गंभीर जखमी झालेत त्यांना तातडीनं आयसीयूमध्ये हलवण्यात गेल्याचं समजतंय. गेल्या दीड ते दोन तासांपासून ही आग विझवण्याचं काम सुरू आहे. पण अजूनही त्यात अग्निशमन दलाला यश मिळालं नाही. या आगीचं स्वरुप इतकं उग्र होतं की आगीनं थोड्याच कालावधीत ही आग पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावरही पोहचली. ही आग कशी लागली याबाबत अजूनही तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. मंत्रालयात सुरक्षेचे तीन-तेरा वाजल्याचं चित्रच यावेळी दिसून येत होतं. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची कसरत सुरूच आहे. अद्यापही जवळजवळ ३० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

 

अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी दाखल झाल्यात. मंत्रालयात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलानं वेळीच दिलासा दिला. लिफ्टच्या साहाय्यानं अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे तातडीचे प्रयत्न अग्निशमन दलानं सुरू केले. काहींना दोरीच्या साहाय्यानं बाहेर काढलं गेलं.

 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार वेळीच बाहेर पडले पण त्यांची कार्यालय मात्र जळून खाक झालं आहे. ऊर्जा, शालेय शिक्षण, नगरविकास खात्याचं कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय अजित पवार यांच्या कार्यालयात दोन कर्मचारी बेशुद्ध पडलेले आढळले. तातडीनं त्यांना बाहेर काढण्यात यश आलं.

 

या आगीत मंत्रालयाचे तीन मजले जळून खाक झालेत. अजूनही एकच धावपळ इथं दिसतेय. कर्मचारी मदतीची याचना करताना दिसत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांची आगीमुळे तारांबळ  उडाली आहे. काही कार्यालयात अडकल्याने त्यांना वाचविण्यास शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेकांचा जीव धोक्यात असल्याने जीवितहानीची भीती व्यक्त होत आहे. कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गडबड-गोंधळ टाळण्यासाठी जे जे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलीय.

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x