www.24taas.com, मुंबई
मुंबई मनपातल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा अधिकच वाढल्यानं मुख्यमंत्र्यांना अखेर दिल्ली दरबारी धाव घ्यावी लागली आहे. राष्ट्रवादीनं आज संध्याकाळचा अल्टिमेटम दिल्यामुळं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडीबाबत निर्णय घेण्यासाठी अखेर दिल्लीला रवाना झाले आहेत.
दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी ते चर्चा करणार असून मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांच्या आघाडीबाबतच्या भावनाही ते पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचवणार आहेत. मुख्यमंत्री आज संध्याकाळी दिल्लीहून मुंबईला परतणार आहेत. त्यानंतरच आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. तर मुंबईतल्या काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांनी पक्षावर दबाव वाढवलाय. राष्ट्रवादीला 45 पेक्षा जास्त जागा देण्यास जोरदार विरोध दर्शवलाय. राष्ट्रवादीची मुंबईत ताकद कमी आहे. तरी त्यांच्याकडून 65 जागांची मागणी अव्वाच्या सव्वा असल्याची मुंबईतल्या कॉंग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडं शरद पवारांनी काँग्रेसला आघाडीच्या जागावाटपाबाबत आज संध्याकाळ पर्यंत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
आघाडीबाबत आमची भूमिका लवचिक आहे. प्रश्न सामोपचारानं सुटला पाहिजे, शेवटपर्यंत थांबून दोघांचे नुकसान होईल, असं पवारांनी म्हटलंय. एकूण कॉंग्रेसला `घड्याळ` दाखवत राष्ट्रवादी कॉंग्रेसनं दबावतंत्राचा वापर केलाय. मुंबईत जर आघाडी झालीच नाही तर त्याचं खापर कॉंग्रेसवर फोडून मोकळं व्हायचं, अशी खेळी राष्ट्रवादीची आहे. 2007मध्ये निवडणूकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आघाडीबाबत चर्चेचं गुऱ्हाळ सुरु होतं. त्यामुळं राष्ट्रवादीला पूर्ण सामर्थ्यानिशी निवडणूकीत उतरता आलं नव्हतं. यावेळी त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राष्ट्रवादीनं कॉंग्रेसला अल्टीमेटम दिलाय. दरम्यान, कॉंग्रेसकडून एनसीपीला अद्यापही आघाडीचं निमंत्रण नाही. त्यामुळे मुंबईत आघाडीबाबत अनिश्चितता कायम आहे.