आनंद परांजपेंची पुन्हा शिवसेनेवर टीका

शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले खासदार आनंद परांजपे यांनी ठाण्यात मतदान केलं. यावेळीही त्यांनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. मला शिवसेनेनं प्रचारासाठी बोलावलं नाही असा आरोप त्यांनी सेनेवर केला.

Updated: Feb 16, 2012, 03:12 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले खासदार आनंद परांजपे यांनी ठाण्यात मतदान केलं. यावेळीही त्यांनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. मला शिवसेनेनं प्रचारासाठी बोलावलं नाही असा आरोप त्यांनी सेनेवर केला. तसच कुणाकडे सत्ता जाईल हे ठाण्याची जनताच ठरवेल असंही त्यांनी सांगितलं.

 

कल्याण डोंबिवलीचे खासदार आनंद परांजपेंनी मध्यंतरी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत नाट्यमयरित्या दाखल होऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यावेळी आनंद परांजपे यांनी शिवसेनाप्रमुखांबद्दल आदर व्यक्त केला होता. मात्र, शिवसेनेच्या सध्याच्या कार्यप्रणालीबद्दल टीकेची झोड उठवली होती.शिवसेनाप्रमुख माझे दैवत आहेत. परंतु, बाळासाहेबांना अपेक्षित असलेली शिवसेना राहिलेली नाही. शिवसेनेत निष्ठावान शिवसैनिकांची गळचेपी होती. तसेच आपल्याला स्थानिक नेतृत्वाकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याची खंत त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती.

 

कल्याण – डोंबिवलीत शिवसैनिकांनी आनंद परांपजे यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. तर राडा देखील करण्यात आला होता. त्यामुळे डोंबिवलीमध्ये जवळजवळ ५० शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. तर दुसरीकडे नालासोपाऱ्यात शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी खासदार आनंद परांजपे यांचा पुतळा जाळला होता.

 

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला गेलेल्या राष्ट्रवादीच्या ज्योती कलानींसोबत खासदार आनंद परांजपेंनीही हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र आपण केवळ ज्योती कलानींना शुभेच्छा देण्यासाठी आलो असून अजूनही आपण शिवसेनेत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत दिसणाऱ्या आणि शिवसेनेतच आहे असं सांगणाऱ्या परांजपेंच्या वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये सतत संभ्रम निर्माण होत आहे..