नागपूर : नागपुरात एका शालेय शिक्षिकेवर सामुहिक बलात्काराची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणी आणि तिच्या मित्राला ५ जणांनी पोलिस असल्याची खोटी बतावणी करत हे कृत्य केले.
महिलेच्या वैदकीय चाचणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले असून नागपूरच्या कळमना पोलिसांनी अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला असल्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान बंडीवार यांनी सांगितले.
नागपूर - भंडारा मार्गावरील हरिश्चंद्र वेळा या गावाजवळ याच ठिकाणी काल रात्री एका २१ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली आहे. पिडीत तरुणी काल संध्याकाळी आपल्या मित्रासह नागपूरच्या कळमना परिसरात स्वामीनारायण मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शनानंतर दोघे दुचाकीवर याच महामार्गावर फिरायला गेले. हायवेवर एका ठिकाणी दोघेही गप्पा मारत असताना दुचाकींवर ५ जण त्या ठिकाणी आले. आम्ही पोलिस आहोत अशी दमदाटी करत त्यांनी दोघांना सोबत चालण्यास सांगितले. घाबरलेले तरुण तरुणी त्यांच्या सोबत गेले.
थोडे दूर गेल्यावर सर्व ५ आरोपींनी तरुणाला मारहाण करत पळवले आणि हरिश्चंद्र वेळा या गावाजवळ निर्जन ठिकाणी नेऊन या तरुणीवर अमानुष अत्याचार केला. दरम्यानच्या काळात मारहाण झालेल्या तरुणाने मैत्रिणीच्या अपहरणाची माहिती पोलिसाना दिली होती. आणि पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. रात्री पिडीत तरुणी आपल्या घराजवळ पोहोचली आणि सर्व घटना समोर आली. पोलिसांनी लगेच तिला रुग्णालयात दाखल केले. आज सकाळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान शासकीय रुग्णालयात झालेल्या वैदकीय चाचणीत तरुणीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ५ आरोपिंविरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. पिडीत तरुणीनुसार ५ पैकी दोन आरोपी २० ते २५ वयोगटातील, तर इतर तिघे ३५ ते ४० वयोगटातील आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.