ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची मुजोरी वाढत चाललीय. फेरीवाल्यांच्या गुंडगिरीमुळे आसनगाव इथं राहणा-या युवकाला नाहक जीव गमवावा लागलाय.
ठाणे स्टेशन परिसरात फेरीवाले, महापालिका अतिक्रमण विभाग, पोलीस आणि रेल्वे पोलीस यांची अभद्र युती झालीय. याचाच फटका या परिसरातून ये-जा करणा-या नागरिकांना बसतोय. एवढ्यावरच हा प्रकार थांबलेला नाही. फेरीवाल्यांना विरोध करणा-यांना मारहाण करण्यापर्यंत या फेरीवाल्यांची मजल जाते.
27 ऑक्टोबरला असाच प्रकार घडलाय. गुंड फेरीवाल्यांनी आसनगावच्या या युवकाला मारहाण केलीय. हा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या मारहाणीतून सुटका करण्याच्या नादात पळून जाताना या 30 वर्षीय युवकाचा ट्रेनखाली येऊन जीव गेलाय. या प्रकरणी अपघाती मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केलीय.
ठाणे नगर पोलिसांनी एनसी नोंदवून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय. याहूनही धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर या परिसरातील सीसीटीव्ही काढून टाकण्यात आलेत. याबाबत आरपीएफला विचारलं असता त्यांच्याकडे याचं कोणतंही उत्तर नाही..