यवतमाळमध्ये सलग १० दिवस पाऊस, जनजीवन विस्कळीत

Updated: May 13, 2016, 11:36 PM IST
यवतमाळमध्ये सलग १० दिवस पाऊस, जनजीवन विस्कळीत title=

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून दररोज अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह बरसत असल्यानं ग्रामीण भागातलं जनजीवन विस्कळीत झालंय. 

दिवसभर कडक ऊन आणि संध्याकाळी अचानक वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा आणि गारांसह पाऊस बरसतोय. वादळी पावसामुळे घरांची पडझड, टिनपत्रे उडणे, गुरांच्या गोठ्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतंय. यवतमाळच्या घाटंजी, वणी, बाभूळगाव, नेर, महागाव, पुसद, उमरखेड तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली असून पावसामुळे घरातील अन्नधान्याची नासाडी झालीय.

शेत मशागतीची कामंही प्रभावित झाली असून मोठमोठी वृक्ष उन्मळून पडत असल्यानं दररोज कुठे न कुठे वाहतूक विस्कळीत होतेय. वादळाचा वीज वितरणलाही मोठा फटका बसला. वादळात वीज वितरण कंपनीचे ११९६ खांब आडवे झाले असून ठिकठिकाणी कोसळलेल्या वृक्षांमुळे तब्बल ८५ किलोमीटरच्या तारा तुटुन पडल्या. 

जिल्ह्यात तब्बल २ कोटी ३६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वीज वितरण कंपनीने व्यक्त केला आहे. फळबागायतदार शेतक-यांचीही मोठी हानी झाली असून डाळिंब, केळी, पपई बागा वादळी पावसाने उध्वस्त झाल्या आहेत. वीज आणि पावसामुळे जिल्ह्यात ४ जणांचा बळी गेला असून अनेक गुरेढोरे देखील मृत्यूमुखी पडले आहेत. जिल्ह्यात ऊन पावसाच्या खेळासोबत वादळी वाऱ्याचे थैमान असल्याने ग्रामीण भागातील जनता हवालदील झाली आहे.